Tue, Jul 16, 2019 11:45होमपेज › Aurangabad › कुत्र्याच्या नसबंदीसाठी ९००; दयामरणासाठी ३०० रुपये

कुत्र्याच्या नसबंदीसाठी ९००; दयामरणासाठी ३०० रुपये

Published On: Apr 09 2018 1:49AM | Last Updated: Apr 09 2018 1:49AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरात दोन वर्षांपासून बंद असलेले कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम आता पुन्हा सुरू होणार आहे. मनपाने नऊशे रुपये प्रतिकुत्रा या दराने पुणे येथील ब्ल्यू क्रॉस या संस्थेला हे काम दिले आहे. यानुसार सन 2018-19 मध्ये या कामावर सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. मोकाट कुत्र्याला पकडून आणून निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे आणि त्यानंतर त्याची सुश्रुषा आणि पुनर्वसन करण्याचे काम या संस्थेला करावे लागणार आहे. 

मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मनपाकडून अशा कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. मात्र दोन वर्षांपासून शहरात हे काम बंद आहे. पालिकेकडून खाजगी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जात होते; परंतु तिथे बिल थकल्याने दोन वर्षांपूर्वी या संस्थेने काम थांबविले होते. त्यानंतर वारंवार निविदा काढूनही त्याला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेने नुकतीच नव्याने निविदा काढली होती. त्यात दोन संस्थांनी निविदा दाखल केल्या. यातील ब्ल्यू क्रॉस या पुणे येथील संस्थेचे दर तुलनेने कमी होते. त्यामुळे या संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली. या संस्थेने प्रत्येक कुत्र्यामागे 950 रुपये असा दर निविदेत भरला होता. मात्र नंतर झालेल्या वाटाघाटीत ही संस्था हेच काम 900 रुपये दराने करण्यास तयार झाली. 

शहरात चाळीस हजार कुत्री
नसबंदीचे काम बंद असल्याने शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात मोकाट कुत्र्यांच्या अक्षरशः झुंडीच्या झुंडी फिरत आहेत. अनेक ठिकाणी हे मोकाट कुत्रे सर्वसामान्यांचे लचके तोडत आहेत. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दोन वर्षांपासून मनपा सर्वसाधारण सभेत सतत होत होती. सद्यःस्थितीत शहरात सुमारे चाळीस हजार मोकाट कुत्रे असल्याचा मनपाचा अंदाज आहे. 

पिसाळलेल्या कुत्र्याला दयामरण
कायद्यानुसार कुत्र्यांना मारणे गुन्हा आहे. मात्र पिसाळलेले, रोगग्रस्त कुत्रे मारण्यास मुभा आहे. त्यासाठी सीआरसीयूच्या नियंत्रणाखाली इंजेक्शन देऊन अशा कुत्र्यास दयामरण दिले जाते. पालिकेने आपल्या निविदेत या दयामरणाच्या कामाचाही समावेश केलेला आहे. दयामरणासाठी प्रतिकुत्रा 421 रुपये असा दर ब्ल्यू क्रॉस संस्थेने निविदेत भरला होता. वाटाघाटीअंती हे काम 300 रुपये दराने करण्यास संस्था तयार झाली.