Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Aurangabad › पती टाळतो म्हणून डॉक्टर महिलेची आत्महत्या

पती टाळतो म्हणून डॉक्टर महिलेची आत्महत्या

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 1:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. साधना जगन्नाथ राऊत (35, रा. झांबड कॉर्नर, दर्गा रोड, रेल्वे गेटजवळ, शहानूरवाडी) यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. पती टाळत असल्यामुळे 9 फेब्रुवारीला सायंकाळी त्यांनी पेटवून घेतले होते. यात त्या 80 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर बीड बायपासवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2016 रोजी डॉ. साधना यांचा विवाह डॉ. चेरी अनिलकुमार रॉय (गायकवाड) यांच्याशी झाला होता. सुरुवातीला काही दिवस ते दोघे पुण्यात डॉक्टर म्हणून नोकरीला होते. चार महिन्यांपूर्वी साधना यांची औरंगाबादेतील कर्करोग रुग्णालयात बदली झाली होती. परंतु, त्यांचे पती पुण्यातच राहतात. त्यांचे कोरेगाव पार्क भागात मोठे घर आहे. ते पुण्यातील बी.जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान, औरंगाबादेत आल्यापासून साधना या माहेरी शहानूरवाडी भागात राहात होत्या. त्या फोनवरून पतीच्या संपर्कात असत. पतीनेही औरंगाबादला बदली करून घ्यावी, अशी त्यांची इच्छा होती, परंतु, डॉ. चेरी हे पुण्याला जास्त प्राधान्य देत असत. यावरून त्यांच्यात नेहमी खटकेही उडत होते. घटनेच्या काही दिवसांपूर्वी सासरे डॉ. अनिलकुमार यांनी याबाबत साधना यांच्याशी चर्चाही केली होती.

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी त्यांनी चेरी यांना फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे रागाच्या भरात साधना यांनी आतून दार बंद करून घेत पेटवून घेतले. यावेळी त्यांचे आई-वडील घरातच होते, परंतु अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्यामुळे त्या जवळपास 80 टक्के भाजल्या. त्यांना तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना दोन दिवसांपूर्वी बीड बायपासवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. बुधवारी त्या उठून उभ्या राहिल्या होत्या. 

गुरुवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. साडेनऊ वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह घाटीत नेण्यात आला. तेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह माहेर आणि सासरच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बी. जी. वेव्हळ करीत आहेत. 

‘त्या’ दिवशी होता पतीचा वाढदिवस
9 फेब्रुवारीला डॉ. चेरी रॉय यांचा वाढदिवस होता. जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी डॉ. साधना यांनी त्यांना फोन लावला, परंतु तो फोन डॉ. चेरी यांनी उचलला नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतले आणि नंतर पेटवून घेतले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कुुटुंबातील चौघेही डॉक्टर
डॉ. साधना यांच्यासह पती डॉ. चेरी रॉय, तसेच सासू डॉ. रेषाकिरण शेंडे आणि सासरे डॉ. अनिलकुमार गायकवाड (रॉय) हे चौघेही प्रसिद्ध डॉक्टर आहेत. साधना या कर्करोग रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आहेत. तर, डॉ. चेरी हे पुण्यातील बी.जे. हॉस्पिटलमध्ये कान-नाक-घसा तज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. रेषाकिरण शेंडे या घाटीत बायो-केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख आहेत. तर, डॉ. अनिलकुमार हे लोणी येथे कार्यरत असून तेही पूर्वी घाटीत मेडिसीन विभागात होते. 

जबाब संदिग्ध
डॉ. साधना यांनी जाळून घेतल्याची माहिती मिळाल्यावर जवाहरनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी त्यांचा जबाब नोंदविला. यात त्यांनी ‘पती फोन उचलत नाहीत, टाळू लागले आहेत‘, अशी माहिती दिली. तसेच, कौटुंबिक कलहाची किनार असल्याचे स्पष्ट केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.