होमपेज › Aurangabad › विद्यापीठाचा विकास आराखडा ६४५ कोटी रुपयांचा

विद्यापीठाचा विकास आराखडा ६४५ कोटी रुपयांचा

Published On: Dec 03 2017 2:39AM | Last Updated: Dec 03 2017 1:53AM

बुकमार्क करा

औरंगाबाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पुढील दहा वर्षांत काय हवे आहे याचा वेध घेऊन विकास आराखडा (आयडीपी) तयार करण्यात आला आहे. 645 कोटी रुपयांची मागणी असलेला हा आराखडा वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. संशोधन, कौशल्य व गुणवत्तापूर्ण शिक्षण ही त्याची त्रिसूत्री असलेला हा आराखडा रुसाकडे (उच्चस्तर शिक्षा अभियान) पाठविण्यात आला आहे. 

सेंटर ऑफ एक्सलन्स, इनक्युबेशन सेंटर

आराखड्यात संशोधन केंद्रस्थानी आहे. विद्यापीठात उच्चकोटीचे संशोधन व्हावे यासाठी चार ते पाच सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याची गरज आहे. प्रत्येक सेंटरसाठी दहा ते 15 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या नवकल्पनांना मूर्त रूप देऊन त्यांचे विद्यापीठात उत्पादन सुरू करण्यासाठी इनक्युबेशन सेंटर उभारण्याची गरज आहे. या सेंटरच्या उभारणीसाठी 20 कोटी रुपयांचा खर्च लागेल. 

रिसर्च पार्क

नवीन लोकांना संशोधनासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना संशोधन सुविधा उपलब्ध करून देणे हा रिसर्च पार्कचा उद्देश आहे. शाळा आणि महाविद्यालयांतील मुलांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी या पार्कचा उपयोग होईल. 

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज वर्गखोल्या

विद्यापीठातील वर्गखोल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. त्यात एलसीडी डिस्प्ले, स्मार्ट क्‍लास आदींचा समावेश राहील. याशिवाय विद्यार्थ्यांना सरावासाठी संगणक प्रयोगशाळा तसेच डीजिटल स्टुडिओच्या प्रस्तावाचाही त्यात समावेश आहे. प्राध्यापकांना त्यांच्या अध्यापनाचे चित्रीकरण करून ते ऑनलाइन टाकता येईल.