Mon, Aug 19, 2019 17:43होमपेज › Aurangabad › दफनविधी करण्यास विरोध झाल्याने महिलेचे प्रेत तहसील कार्यालयात 

दफनविधी करण्यास विरोध झाल्याने महिलेचे प्रेत तहसील कार्यालयात 

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 09 2018 12:32AM

बुकमार्क करा
पैठण : प्रतिनिधी

तालुक्यातील पाटेगाव येथील गायरान जागेवर भिल्‍ल समाजातील एका मृत महिलेच्या प्रेतावर दफनविधी करण्यास काही शेतकर्‍यांनी विरोध केल्याने संतप्‍त नातेवाइकांनी महिलेचे प्रेत थेट येथील तहसील कार्यालयासमोर आणून ठेवले. त्यानंतर त्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. दफन विधी करणार्‍यास  शेतकर्‍यांच्या विरोधात जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहिल, असा आक्रमक पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने परिसरात प्रचंड तणाव पसरला. दरम्यान, पोलिस व महसूल प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर तब्बल दहा तासानंतर या महिलेचा दफनविधी करण्यात आला.    .

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  रविवारी संध्याकाळी रात्री आठ वाजता मीराबाई सुखदेव बरडे ( 55, रा. पाटेगाव, ता. पैठण) या महिलेचे निधन झाले. सोमवारी सकाळी नातेवाइकांनी दफनविधी  करण्यासाठी महिलेच्या प्रेताला शासनाने दिलेल्या जागेवर नेले. मात्र काही शेतकर्‍यांनी या दफनविधीस कडाडून विरोध केला. दफनविधी करण्यासाठी चार वेळा खड्डे खोदण्याचा नातेवाइकांनी प्रयत्न केला, तरी  शेतकर्‍यांचा विरोध सुरूच होता. दरम्यान,  मृताच्या नातेवाइकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तरीही शेतकर्‍यांचा विरोध कायम होता. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी तीन किलोमीटर पायपीट करत तहसील कार्यालयात या महिलेचे प्रेत आणले. त्यानंतर त्यांनी येथे दोन तास ठिय्या आंदोलन केले. दफनविधी करणार्‍या शेतकर्‍यांच्या विरोधात जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील, असा आक्रमक पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने परिसरात प्रचंड तणाव पसरला. दरम्यान, पोलिस व महसूल प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर तब्बल दहा तासांनंतर या महिलेचा दफनविधी गोदावरी नदीच्या काठावर करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक चंदन ईमले, भिल्ल समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक बरडे यांच्यासह मृताचे नातेवाइकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
 

भिल्ल आदिवासी समाज दारिद्र्यात

देशाला स्वतंत्र मिळून 70 वर्ष झाली, तरी ही भिल्ल आदिवासी समाज दारिद्य्राचे जीवन जगत आहे. या मातीत जन्म घेऊन त्याच मातीत मरणानंतर तीन फूट जागा अंत्यसंस्कारासाठी मिळत नाही. ही  फार मोठी शोकांतिका आहे. पाटेगाव येथे भिल्ल समाजाची पूर्वीपासून स्मशानभूमी आहे. या ठिकाणी काही शेतकर्‍यांनी अतिक्रमण केले. सोमवारी सकाळी सुरेश रावस व इतर तीन शेकर्‍यांनी या महिलेची अंत्ययात्रा अडवून दहा तास अवहेलना केली. या शेतकर्‍यांविरोधात  गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी  भिल्ल समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अशोक बरडे यांनी केली.

स्मशानभूमीसाठी जागा देणार : महेश सावंत 

पैठणजवळील पाटेगाव येथे झालेली प्रकार दुर्दैवी आहे. भिल्ल समाजाला एक महिन्याच्या आत स्मशानभूमीसाठी जागा दिली जाईल. पूर्वीच्या जागेवर अतिक्रमण झाले असा आरोप, या समाजाने केला आहे. तसे असेल तर यांची चौकशी करून जागेचा ताबा भिल्ल समाज दिला जाईल असे तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले.