होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : माणुसकी संपली; मृतदेह तासभर रस्त्यावर

माणुसकी संपली; मृतदेह तासभर रस्त्यावर

Published On: Jul 15 2018 12:13PM | Last Updated: Jul 15 2018 12:13PMऔरंगाबाद : हर्षवर्धन हिवराळे

घाटी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांमध्ये ‘माणुसकी’ शिल्लकच राहिली नसल्याचा प्रत्यय शनिवारी पुन्हा एकदा आला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी कागदोपत्री कार्यवाही करीत कर्मचार्‍याला मृतदेह बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अन् नातेवाइकांना येईपर्यंत मृतदेह वॉर्डात राहू द्या, अशी मातेने विनंती केली; परंतु ती विनंती डॉक्टरांनी धुडकावून लावली. शेवटी डॉक्टरच्या आदेशाची पूर्तता करीत कर्मचार्‍याने या तरुणाचा मृतदेह आणून घाटी पोलिस चौकीसमोर रस्त्यावर ठेवला. पावसाच्या वातावरणात तासभर मृतदेह रस्त्यावर तसाच पडून राहिला. शनिवारी दुपारी हा संतापजनक प्रकार घडला.

त्याचे झाले असे की, जालना येथील फुकरनगरातील रहिवासी महेबूबखान सरदारखान पठाण (22) या तरुणाला 8 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी अचानक उलट्या होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याची आई जुलेखाखान पठाण यांनी त्याला उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात आणून दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास महेबूबखानचा मृत्यू झाला. यावेळी महेबूबखान सोबत आई व एक लहान भाऊ होता. मुलाच्या मृत्यूची वार्ता कळताच मातेने हंबरडा फोडला. इकडे रडारड सुरू असतानाच डॉक्टरांनी आपली कागदोपत्री कार्यवाही पूर्ण केली आणि कर्मचार्‍याला बोलावून मृतदेह पोलिसांकडे घेऊन जा, असे आदेश दिले.

वास्तविक पाहता रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्याची माहिती आधी घाटी पोलिस चौकीत कळविणे बंधनकारक असते. माहिती कळविल्यानंतर पोलिस कायदेशीर कार्यवाही पूर्ण करतात. त्यानंतर मृतदेह वॉर्डातून शवविच्छेदनगृहाकडे हलविणे अभिप्रेत असते; परंतु संबंधित डॉक्टरांनी महेबूबच्या मृत्यूची माहिती पोलिसांना कळविण्यापूर्वीच स्वत:ची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून मृतदेह पोलिसांकडे पुढील कार्यवाहीसाठी घेऊन जाण्याचे सांगितले. डॉक्टरांच्या आदेशानुसार कर्मचार्‍यानेही मृतदेहस्ट्रेचरवर ढकलत आणून घाटी पोलिस चौकीसमोरील रोडवर आणून ठेवला. 

घाटी चौकीसमोर तासभर रस्त्यावर मृतदेह डॉक्टरांच्या आदेशानुसार कर्मचार्‍याने स्ट्रेचरवर मृतदेह आणून घाटी पोलिस चौकीसमोर ठेवला आणि कार्यवाहीची कागदपत्रे पोलिसांकडे दिली. हे पाहून पोलिस चौकीतील पोलिस भडकले. आधीच आम्हाला एमएलसी का पाठविली नाही, असे पोलिसांनी सुनावले. त्यानंतर पोलिसांनी कागदोपत्री कार्यवाहीला सुरुवात केली. त्यात तब्बल एक तास गेला. तोपर्यंत पावसाच्या वातावरणात हा मृतदेह पोलिस चौकीसमोर रस्त्यावर तसाच पडून होता. तासाभरानंतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली. नंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शवागृहात नेण्यात आला.

सतत अवहेलना
मृतदेहांची डॉक्टर, कर्मचार्‍यांकडून अशी अवहेलना होण्याचा ही घाटीतील पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा अशी अवहेलना झालेली आहे. उन्हात तास्तास मृतदेह बाहेर स्ट्रेचरवर पडलेले असतात.

आईची विनंतीही धुडकावली

महेबूबच्या मृत्यूची माहिती कळताच त्याचे जालन्याचे काही नातेवाईक घाटीत येण्यासाठी निघाले. तसेच शहरातील गणेश कॉलनी भागातही काही नातेवाईक राहतात. त्यांनाही निरोप मिळाल्यानंतर ते येण्यासाठी निघाले. त्यामुळे नातेवाईक येईपर्यंत आणि पोलिसांची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मुलाचा मृतदेह वॉर्डातच राहू द्या, अशी विनंती महेबूबच्या आईने केली. मात्र, डॉक्टरांनी ती विनंती धुडकावून लावत, कर्मचार्‍याला ‘तुला सांगितले ना, मृतदेह घेऊन जा’ असे म्हणत मृतदेह बाहेर काढला.