Tue, Jul 23, 2019 18:47होमपेज › Aurangabad › गुजरातच्या ‘एमआर’चा औरंगाबादमध्ये मृत्यू

गुजरातच्या ‘एमआर’चा औरंगाबादमध्ये मृत्यू

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 12:45AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

22 डिसेंबरला औरंगाबादमध्ये आलेल्या गुजरातच्या व्यक्‍तीचा 27 डिसेंबर रोजी कुजलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील शिवशक्‍ती लॉजमध्ये मंगळवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

राकेशभाई हसमुखभाई पटेल (39, रा. नारोडा, अहमदाबाद) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, राकेशभाई पटेल हे सर्जिकल कंपनीच्या कामानिमित्त 22 डिसेंबर रोजी औरंगाबादेत आले. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शिवशक्‍ती लॉजमधील रूम क्रमांक सतरामध्ये ते थांबले. 24 डिसेंबरपासून त्यांचे गुजरात येथील नातेवाईक मोबाइलवर कॉल करीत होते. मात्र त्यांचा मोबाइल लागत नव्हता. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या रूममधून दुर्गंधी येऊ लागल्यावर संशय आल्याने लॉजमालकाने दरवाजा वाजविला. त्यांना अनेकदा आवाजही दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर लॉजचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा समोर पटेल यांचा कुजलेला मृतदेह आढळला. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत घाटीत हलविले. त्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. परंतु, पटेल यांच्या मृत्यूचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच हा प्रकार स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. 

लॉज व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

लॉजच्या खोलीत ग्राहकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण थेट दुर्गंधी आल्यानंतर उघड होणे, ही गंभीर बाब आहे. एखादा ग्राहक आल्यावर तो दुसर्‍या दिवशी दिसला नाही किंवा त्याच्या खोलीतून काहीच हालचाल होत नसेल तर याबाबत लॉज व्यवस्थापनाने माहिती घेणे अपेक्षित असते, परंतु थेट खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर हा प्रकार समोर आल्यामुळे लॉज व्यवस्थापनाचे किती दुर्लक्ष आहे, हे समोर आले.