औरंगाबाद : प्रतिनिधी
खुलताबाद ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकाचा जामीन घेताना एकाने चक्क विक्री केलेल्या जमिनीचा सातबारा वापरून बाल न्याय मंडळाची फसवणूक केली. हा प्रकार समोर आल्यावर न्यायालयाच्या आदेशाने 5 फेब्रुवारी रोजी सिटी चौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
शिवाजी देवाजी नागे (रा. सराई, ता. खुलताबाद) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जमिनीच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच न्यायालयाच्या आदेशाने पुढील कार्यवाही केली जाईल. यात आरोपीला अटकही होऊ शकते, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध कलम 376 (2) (1) सह कलम 4 लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012 नुसार खुलताबाद ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले.
न्यायालयाने त्याला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, काही दिवसांनंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानुसार, 18 जुलै 20017 रोजी शिवाजी नागे याने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन घेतला. त्यावेळी नागे याने सराई येथील गट क्र. 154 चा सातबारा दिला होता. मुळात ही जमीन 29 मार्च 2017 रोजी खरेदीखत क्र. 275/17 अन्वये संजय अंबादास पाडळे यांना विक्री केलेली आहे. विशेष म्हणजे, ही माहिती असतानाही शिवाजी नागे याने त्याच जमिनीचा सातबारा आरोपीचा जामीन घेताना वापरल्याची तक्रार एकाने न्यायालयात केली. दरम्यान, न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा प्रकार असल्याने या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, बाल न्याय मंडळातील लिपिक शेख मुनिरोद्दीन शेख खाजामियाँ यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास हवालदार सय्यद मुजीब करीत आहेत.