Wed, Jun 26, 2019 18:07होमपेज › Aurangabad › बाबूगिरीवर महापौर संतापले

बाबूगिरीवर महापौर संतापले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी पालिकेतील विकास कामांची एकत्रित आढावा बैठक घेतली. त्यांनी अधिकार्‍यांपुढे तब्बल 57 कामांची यादी ठेवत प्रत्येक कामाच्या प्रगतीविषयी विचारणा केली. मात्र बहुतेक अधिकार्‍यांना सध्या त्या कामांच्या संचिका कुठे आहेत, त्यात पुढे काय झाले हेच माहिती नव्हते. पालिकेतील ही बाबूगिरी पाहून महापौर चांगलेच संतापले. त्यांनी पालिकेतील दफ्तरदिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकार्‍यांना फैलावर घेतले. 

घोडेले यांनी महापौर पदाचा पदभार घेऊन चार महिने उलटले आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी मंगळवारी पालिकेतील सर्व अधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेऊन विविध विषयांवर आढावा घेतला. अनेक कामांच्या निविदा अंतिम झालेल्या असताना प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही, काहींचे अंदाजपत्रक मंजूर असताना त्याच्या फायली पुढे सरकत नाहीत, याबद्दल महापौरांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मिटमिटा भागात सफारी पार्क उभारण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे, परंतु सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रशासनाकडून अजूनही एजन्सी नियुक्त झालेली नाही. ही फाईल सध्या कोणाकडे आहे, याची विचारणा केली असता, प्रत्येकाने मी पाठविली. असेच उत्तर दिले. त्यावर महापौरांनी फाइलचा शोध घेऊन निधीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. समांतर पाणीपुरवठा योजनेचा शासनाकडे व न्यायालयीन कामकाजासाठी पाठपुरवठा करतानाचे अहवाल सादर करण्याचे महापौरांनी सूचित केले. 

महापौरांनी 2018-19 मध्ये मोफत अंत्यसंस्कार योजना पुन्हा सुरू करण्याचे आधीच जाहीर केलेले आहे, परंतु प्रशासनाने त्यांच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदच केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या. अनधिकृत मोबाइल टॉवरवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी काही महिन्यांपूर्वीच अधिकार्‍यांना दिले होते, मात्र त्यावरही अद्याप काहीच झालेले नसल्याचे समोर आले. यासोबत मनपाच्या अनेक कामांमध्ये अधिकार्‍यांकडून काहीच पाउले उचलली जात नसल्याचे दिसून आले.


  •