होमपेज › Aurangabad › अख्ख्या शहरातच दूषित पाणीपुरवठा

अख्ख्या शहरातच दूषित पाणीपुरवठा

Published On: Apr 14 2018 2:01AM | Last Updated: Apr 14 2018 2:00AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

निम्म्या शहराचा नव्हे तर जवळपास अख्ख्या शहरातच गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत शहरातील जलकुंभांतील पाण्याचे नमुने पाठविले होते. त्यात चिकलठाणा, पुंडलिकनगर, संजयनगर, सेव्हनहिल येथील जलकुंभांपाठोपाठ सिडको एन-5, सिडको एन-7 आणि मरीमाता (शहागंज) या आणखी तीन जलकुंभांचे पाणी नमुने दूषित आढळून आले. यावरून शहरात कचर्‍याबरोबरच पाण्याबाबतही हलगर्जीपणा करीत महानगरपालिका शहरवासीयांच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आधीच कचर्‍यामुळे अख्ख्या शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचराकोंडीमुळे जागोजागी साचलेल्या कचर्‍यांच्या ढिगांनी रोगराई वाढत चालली आहे. त्यातच आता दूषित पाण्याने नागरिकांची झोप उडविली आहे. मागील काही दिवसांपासूनच शहरातील अर्ध्याअधिक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे येत होत्या. मात्र, मनपा प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा काही भागांमध्ये गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आले, तेव्हा कोठे प्रशासन हलले. त्यानंतर मनपा अधिकारी, पदाधिकार्‍यांनी फारोळा जलशुद्धीकरणात जाऊन तपासणी केली. अधिकार्‍यांनी तेथे शहराकडे येणारे पाणी हे शुद्ध असल्याचे सिद्ध करून दाखविले. तेथून शुद्ध पुरवठा होत आहे, मग पुढे खरोखरच पाणी दूषित आहे का?, याचा शोध घेण्यासाठी शहरातील 13 जलकुंभातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी छावणी येथील फॉरेन्सिक लॅबकडे 6 एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते.

अहवालाची लपवा लपवी!

विशेष म्हणजे पाणी तपासणीचा अहवाल तीन दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला होता; परंतु अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी या अहवालाची लपवा लपवी करण्याचा प्रयत्न केला. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न अखेर उघडकीस आला. या अहवालात 13 जलकुंभांपैकी गुरुवारी पुंडलिकनगर, चिकलठाणा, संजयनगर आणि सेव्हनहिल येथील कडा कार्यालयाजवळील जलकुंभ अशा चार ठिकाणी दूषित पाणी असल्याचे आढळून आले होते. त्यापाठोपाठ शुक्रवारी आणखी तीन जलकुंभांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. यामध्ये सिडको-5, सिडको-7 आणि जुन्या शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शहागंज परिसरातील मरीमाता या जलकुंभाचे पाणी नमुने दूषित आढळून आले. 

म्हणे वेळीच उपाययोजना केल्या

या संदर्भात बोलताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आम्हाला अहवाल मिळताच आम्ही तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पाण्यात क्‍लोरीनची मात्रा कमी पडली होती. ती वाढविण्यात आली आहे. आता शहरात शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणीपुरवठा होत असल्याचा दावा महापौरांनी केला.