Mon, Aug 19, 2019 17:34होमपेज › Aurangabad › कचर्‍यामुळे हर्सूलकरांना मिळणार दूषित पाणी

कचर्‍यामुळे हर्सूलकरांना मिळणार दूषित पाणी

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 26 2018 12:11AMहर्सूल : बाबासाहेब बोकील 

हर्सूल येथे शहरातील कचर्‍याची शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा दावा मनपा प्रशासन करत आहे, परंतु हर्सूल येथील पाझर तलावाच्या पायथ्याशी कचर्‍याचे वर्गीकरण न करता तलावाच्या पाण्याच्या सांडव्यात कचरा टाकला जातो. या ठिकाणी ऐतिहासिक अंबर नहर व हर्सूल गावाची सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर आहे. सध्या या ठिकाणावरूनच हर्सूलकरांना पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात कचर्‍यातील पाणी जमिनीत पाझरून थेट या विहिरीत उतरू शकते. त्यामुळे या विहिरीतून ज्या हर्सूल परिसरात पाणीपुरवठा होतो तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे मनपाने येथे कचरा टाकू नये, अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे. 

शिष्टमंडळाने घेतली महापौरांची भेट

हर्सूल-सावंगी परिसरातील नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध कायम ठेवला आहे. कचर्‍यामुळे विहिरीचे आणि तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका असल्याने जागा बदलावी, यासाठी तेथील रहिवाशांनी शुक्रवारी महापौरांना निवेदन दिले. तत्पूर्वी या शिष्टमंडळाने मुख्यालयात निदर्शने करीत मनपाचा निषेध केला. दरम्यान, कचर्‍यामुळे खरोखरच पाणी दूषित होण्याचा धोका आहे का? याची चाचपणी करण्यासाठी आयुक्‍त व तज्ज्ञांना पाठविले जाईल, असे आश्‍वासन महापौर घोडेले यांनी या शिष्टमंडळाला दिले. त्यानुसार आयुक्‍तांकडे पत्रही पाठविण्यात आले.