Wed, Feb 20, 2019 04:53होमपेज › Aurangabad › चारशे रुपये कमी; बँकेला ४८ हजारांचा दंड

चारशे रुपये कमी; बँकेला ४८ हजारांचा दंड

Published On: May 19 2018 7:58AM | Last Updated: May 19 2018 7:58AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘एटीएम’मधून कमी पैसे मिळाल्याची तक्रार करूनही  दाखल न घेतल्याप्रकरणी ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’ने अर्जदाराला रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे प्रतिदिन 100 रुपये दंड या हिशेबाने 47 हजार 700 रुपये आणि तक्रार खर्चापोटी एक हजार रुपये 30 दिवसांच्या आत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोळे आणि संध्या बारलिंगे यांनी दिले.

या प्रकरणी समाधान भगवान वानखेडे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने मंचाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, समाधान याने 1 ऑक्टोबर 2016 रोजी एसबीएचच्या एटीएममधून 1500 रुपये काढले. मात्र, मशीनमधून केवळ 1100 रुपयेच प्राप्त झाले. त्याने या संदर्भात 4 ऑक्टोबर रोजी बँकेकडे तक्रार दाखल केली. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अशा प्रकरणात सात दिवसांत तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक असताना बँकेने तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अर्जदाराने वारंवार सर्व संबंधितांकडे तक्रार अर्ज केले, विनंती केली; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, 5 फेब्रुवारी 2018 रोजी त्याच्या खात्यात 400 रुपये वर्ग करण्यात आले. या प्रकरणी सेवेतील त्रुटी, मानसिक त्रास, तक्रार खर्च, कायद्यानुसार भरपाई मिळण्याची विनंती अर्जदाराच्या वतीने करण्यात आली. याप्रकरणी सुनावणीवेळी प्रतिवादी बँकेला नोटीस देण्यात येऊनही त्यांच्यातर्फे कोणीही मंचात हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने एकतर्फी सुनावणी घेतली.

ग्राहक मंच काय म्हणाले? 

रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे तक्रार प्राप्त होताच सात दिवसांत त्याचे निराकरण करणे आणि त्याची सूचना तक्रारदाराला देणे बंधनकारक होते. असे न केल्यास प्रतिदिन 100 रुपये दंड देण्याची जबाबदारी बँकेवर येते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तब्बल 477 दिवस बँकेने तिचे निराकरण केले नाही. त्यामुळे 477 दिवस प्रतिदिन 100 रुपयां याप्रमाणे नुकसानभरपाईस तक्रारदार पात्र ठरत असल्याचे मत मंचाने नोंदविले आणि वरीलप्रमाणे आदेश दिले.