Tue, Sep 17, 2019 21:58होमपेज › Aurangabad › विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे चार आमदार भाजपमध्ये जाणार

विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे चार आमदार भाजपमध्ये जाणार

Published On: May 26 2019 7:17PM | Last Updated: May 26 2019 7:17PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे चार आमदारही भाजपमध्ये जाणार आहेत. मोदींच्या पंतप्रधान पदाचा शपथविधी कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा होणार आहे, या वृत्‍तास सत्तार यांनीही दुजोरा दिला आहे.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत रसातळाला गेलेल्या काँग्रेसला सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे आली होती. गेल्या साडेचार वर्षात त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसला संजिवनी देत उभे केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. औरंगाबादेतून हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी द्यावी, अशी सत्तार यांची मागणी होती. झांबड यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व पक्षश्रेष्ठींनी कायम ठेवल्याने सत्तार यांनी नाराजी व्यक्‍त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सत्तार यांचा निर्णय योग्य होता, हे 23 मे रोजीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीत नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोडवून घेण्यासाठी विखे पाटील यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र आघाडीत ही जागा राष्ट्रवादीने सोडली नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. आता विखे पाटील हे एकटेच नव्हे तर काँग्रेसचे दुखावलेल्या चार आमदारांनाही सोबत घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना 1 लाख 24 हजार 813 मते मिळवून देत सर्वाधिक लीड दिली आहे. तर काँगे्रसच्या विलास औताडे यांना 44,988 मते मिळाली आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघापैकी सिल्लोडमध्ये दानवेंना सर्वाधिक मते आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर दानवे यांचा एक लाख मतांनी पराभव केल्याशिवाय डोक्यावरील केस वाढवणार नाही, असा संकल्प सत्तार यांनी केला होता. तेव्हापासून गेली साडेचार वर्षे त्यांनी टक्कल ठेवत गांधी टोपी घातली होती. आता भाजप प्रवेशानंतर त्यांची ‘केस’ आपोआपच सुटली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी आमची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची चर्चा होणार आहे. मोदींचा शपथविधी कार्यक्रम झाल्यानंतरच ही बैठक होईल. 1 ते 6 जूनदरम्यान ही बैठक होण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार, आमदार.