Thu, Jan 17, 2019 03:53



होमपेज › Aurangabad › खड्डे बुजवण्यासाठी  काँग्रेसचे ‘भीक मांगो’

खड्डे बुजवण्यासाठी  काँग्रेसचे ‘भीक मांगो’

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:05AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

शिवाजीनगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी मनपाला सढळ हाताने मदत करा, असे आवाहन करत, काँग्रेसतर्फे सोमवारी भीक मांगो आंदोलन करण्यात आले. 

शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूंनी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रेल्वे क्रॉसिंग गेट उघडल्यानंतर एकाचवेळी दोन्ही बाजूंनी वाहने सुटतात. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून लहान-मोठे अपघात होतात. हे खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. जितेंद्र देहाडे यांनी 3 फेब्रुवारी रोजी मनपाच्या शहर अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. आठवडाभरानंतरही मनपाकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. मनपा प्रशासनाकडे निधी नसल्याने हे काम होत नसल्याचे प्रशासनाने कळवले. त्यामुळे सोमवारी देवळाई चौकात शहराध्यक्ष नामदेव पवार, डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या नेतृत्वाखाली भीक मांगो आंदोलन करण्यात आले. परिसरातील लहान-मोठे व्यावसासिक, रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, दुकानदारांनी खारीचा वाटा उचलत हातभार लावला. यावेळी जमा झालेले 542 रुपये शिष्टमंडळाने शहर अभियंत्यांना नेऊन दिली, मात्र त्यांनी सदर  रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे डिमांड ड्राफ्टद्वारे हे पैसे मनपाला पाठवण्यात येतील. तसेच रस्त्यावरील खड्डे तत्काळ न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. देहाडेयांनी दिला. आंदोलनात महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, अ‍ॅड. सय्यद अक्रम, अकिल पटेल, खालेद पठाण, अतिष पितळे, गौतम माळकरी, सरोज जेकब, अनिता भंडारी,  शरद कदम, हकीम पटेल, मुनाफ पटेल, मोईन कुरेशी, अ‍ॅड. क्षितिजकुमार रोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.