Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Aurangabad › सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव बारगळला

सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव बारगळला

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:31AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

वडगाव कोल्हाटी येथील सरपंच महेश भोंडवे व उपसरपंच हौसाबाई पाटोळे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या 12 सदस्यांचा अविश्‍वास ठराव बुधवारी (दि. 2) आयोजित विशेष सभेत बारगळला. 17 पैकी एकही  सदस्य फिरकला नसल्यामुळे हा ठराव बारगळल्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी सांगितले.

 दोन वर्षांपूर्वी या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. यात 17 पैकी 16 जागा मिळवत शिवसेनेने वर्चस्व राखले होते. तेव्हा सरपंचपदी महेश भोंडवे तर उपसरपंचपदी हौसाबाई पाटोळे यांची बहुमताने निवड झाली होती.  दरम्यान काही दिवसांपासून सरपंच तसेच उपसरपंच सदस्यांना विश्‍वसात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याचा आरोप करत श्रीकृष्ण भोळे, मोहन गिरी, अरुण वाहुळे, सचिन गरड, श्रीकांत साळे, रमाकांत भांगे, अमित चोरडिया, उषा हंडे, अलका शिंदे, उषा साळे, मंदाबाई भोकरे, वैशाली जिवरग या 12 सदस्यांनी 23 एप्रिल रोजी तहसीलदारांकडे सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर होण्याबाबतचा ठराव दाखल केला होता. 

विशेष सर्वसाधारण सभेस दुपारी 2 वाजता तहसीलदार सोनी यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. मात्र निर्धारित वेळेत 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकही सदस्य बैठकीस फिरकला नाही. तहसीलदारांनी हा अविश्‍वास ठराव फेटाळला गेल्याचे जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी हरिष आंधळे, तलाठी सुनील निकम आदींची उपस्थिती होती. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवला होता. 

दरम्यान 1 मे रोजी सहलीवरून परतलेल्या 10 सदस्यांनी रात्री उशिरा शहरातील सेनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. अविश्‍वास ठरावासंदर्भात आयोजित विशेष सभेस अनुपस्थितीत राहून सहलीवरून परतलेल्या सदस्यांनी ग्रापंचायतीलगत असलेल्या एका विवाह सोहळ्यास हजेरी लावली, तर सरपंच व उपसरपंच यांच्यासोबत असलेले सदस्य देवदर्शनासाठी गेले असल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळत होती.

आमच्या प्रतिनिधीने लग्‍न समारंभाच्या ठिकाणी जाऊन अविश्‍वास ठराव दाखल करणार्‍या सदस्यांना याविषयी विचारणा केली असता, आमच्या वरिष्ठ पदिाधकार्‍यांसोबत चर्चा झाली असून लवकरच याविषयी तोडगा काढू, असे आश्‍वासन त्यांनी आम्हाला दिले असल्याचे सचिन गरड यांनी सािंगतले.