Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Aurangabad › शहराची घाण आम्हाला नको!

शहराची घाण आम्हाला नको!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, परंतु कचरा टाकण्यासाठी प्रशासनाला आमचीच जागा दिसत आहे का? नारेगाव कचरा डेपो अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर होता. आता तर आमच्या बांधाला लागूनच कचरापट्टी होणार असल्याने जगणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे दुग्धनगरीच्या ठिकाणी कचरा प्रकल्पाला आमचा विरोध आहे. लोकशाही मार्गाने निवेदने, आंदोलने, उपोषणे, बेमुदत उपोषण करू, मात्र शहराची घाण आम्हाला नकोय. असा रोष व्यक्त करीत कचरापट्टीविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचा एक सूर चिकलठाणावासीयांनी काढला.

 शहराची कचराकोंडी होऊन चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मनपा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न करूनही हाती यश आले नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने कचरा टाकण्यासंबंधी जागा निश्‍चितीचा निर्णय शासनाच्या विभागीय समितीवर सोपविल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. त्यानंतर गुरुवारी (दि. 29) आयुक्तालयात झालेल्या बैठकीत समितीने चिकलठाणा येथील दुग्धनगरीची जागा निश्‍चित केली. मात्र, या निर्णयाची माहिती मिळताच आता चिकलठाणावासीयसुद्धा कचरापट्टीच्या विरोधासाठी एकवटले आहेत. येथील रहिवाशांमध्ये कचर्‍याला विरोध करण्यासंदर्भात ठिकठिकाणी गटचर्चा, विचारविनिमय सुरू आहे. दुग्धनगरीच्या जागेवर कचर्‍यावर कंपोस्िंटग प्रक्रिया होईल, त्यामुळे परिसरातील नागरिकांना काही अडचण होणार नाही. तरीही कोणी विरोध केला तर गुन्हे दाखल करू असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, शहराची घाण आमच्याकडे नकोच, अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे. याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. 

दुग्धनगरीच्या परिसरात रहिवासी घरे नसल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, ही जागा हायवेजवळच असून अवघ्या काही अंतरावरच हीना नगर, सावित्रीनगर, चौधरीनगर या वसाहती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय चिकलठाण्यातील अनेकांची शेती, जनावरांचे गोठे दुग्धनगरीच्या बांधाला लागूनच आहे.  
 


  •