Thu, Jun 27, 2019 11:53होमपेज › Aurangabad › ब्लॉग : ‘यशोदे’ला विसरतोय 

ब्लॉग : ‘यशोदे’ला विसरतोय 

Published On: Jan 07 2018 9:44AM | Last Updated: Jan 07 2018 9:44AM

बुकमार्क करा

प्रेयसीने सांगितल्यामुळे त्या युवकाने आईला संपवून हृदय काढले आणि पळत पळत तो प्रेयसीकडे जाऊ लागला. वाटेत ठेच लागल्यामुळे तो पडला.. तेव्हा त्याला आईचा आवाज आला.. लागलं का रे बेटा?.. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा तो आवाज हातात असलेल्या हृदयातून आला होता, अशा आशयाची कथा सर्वश्रूत आहे.

आई या दोन अक्षरी शब्दाची महती अनेकांनी वर्णन केली आहे, परंतु बदलत्या समाज आणि कुटुंबव्यवस्थेचे परिणाम सगळ्यांनाच सहन करावे लागत आहेत, त्यातून आईही सुटली नाही. मग घरात नकोशा असणार्‍या आईला वृद्धाश्रमाचा नाही तर बाहेरचा रस्ता दाखवला जातो. कुणी सांभाळण्यास तयार होत नाही. एखादी आई महसूल प्रशासनाकडे दाद मागून मुले सांभाळत नसल्याची तक्रार करते. सगळ्याच जणी असे करत नाहीत, कारण मुलाची माया त्यांना कायद्याकडे वळू देत नाही.

नववर्षातील काही घटना आई या शब्दाभोवती बर्‍या-वाईट पद्धतीने रेंगाळल्या आहेत. त्यातील राजकोटचा प्रकार तर भयावहच म्हटला पाहिजे. जयश्रीबेन नथवानी या 64 वर्षीय ब्रेन हॅमरेजने त्रस्त असलेल्या आईला प्राध्यापक असणार्‍या मुलाने गच्चीवरून फेकल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली. जयश्रीबेनचा मृत्यू सप्टेंबर 2017 मध्ये टेरेसवरून पडल्यामुळे झाला होता. त्या आजारी असल्याने त्यांनी आत्महत्या केली असा बनाव मुलगा संदीप याने केला, परंतु काही दिवसांपूर्वी पोलिसांना प्राप्‍त झालेली निनावी चिठ्ठी आणि सीसीटीव्ही फुटेजचा तपास केल्यानंतर मुलाने आईला गच्चीवरून फेकल्याचे निष्पन्‍न झाले. वैद्यकीय अहवालातही बेन या हिंडू-फिरू शकत नव्हत्या, असे नमूद करण्यात आले आहे. आजारी आईची सेवा करून मी थकलो, त्यामुळे तिला मारण्याचा निर्णय घेतला, असा युक्‍तिवाद प्राध्यापक महोदयाने केला.

कोणी मरण पावल्यानंतर जाळण्यासाठी लाकडे मिळणे किती अवघड झाले आहे. उत्तर देशातील उन्‍नाव जिल्ह्यात सरवन येथे आई मरण पावल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास गावात लाकडे मिळत नसल्याने हरिराम या तिच्या मुलाने मोठा भाऊ श्यामसुंदर याला त्याच्या अंगणातील झाड तोडण्याचा पर्याय सांगितला. झाड तोडून अंत्यसंस्कार करू अशी त्याची कल्पना होती. पण हा वाद एवढा वाढला की, श्यामसुंदर व त्याच्या मुलांनी हरिरामला लाकडाने बदडून काढले. या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हरिरामचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एका मरण पावलेल्या आईची चिता रचण्याच्या नादात तिच्या एका मुलाला प्राण गमवावे लागले. बरेलीत 90 वर्षांची आई आणि 40 वर्षांचा मुलगा एकत्र राहत होते. तीन दिवसांपासून काही खायला-प्यायला नसल्याने तिच्यासमोर मुलाचे निधन झाले.

‘एक डोळा असलेल्या आईची गोष्ट’ वाचनात आली. मुलाला एकच डोळा असल्याने आईने मुलासाठी डोळा काढून दिला. मुलगा दोन्ही डोळ्यांनी पाहू लागला. आई मात्र राहिली एका डोळ्याची. एक डोळा असलेल्या आईचा पोरगा असे त्याला सगळेजण हिणवत. मुलगा मोठा झाला, त्याने खूप संपत्ती कमावली. आपला बायकापोरांसह तो राहू लागला.. एका मोठ्या बंगल्यात. एके दिवशी त्याला शोधत शोधत आई भेटण्यासाठी आली. तेव्हा त्याने तिला हाकलून दिले. काही दिवसांनी त्याला गावाकडून निरोप आल्यावर तो गावी गेला, तेव्हा आई मृतावस्थेत पडली होती. बरं झालं.. मला आता लोक काही नावं ठेवणार नाहीत, असं तो मनाशी म्हणू लागला, त्याचे लक्ष सहज तेथे ठेवलेल्या एका चिठ्ठीवर गेले, त्यावर आईने लिहिले होते, की तुला जन्मत: एकच डोळा होता. लोकांनी तुला काही म्हणू नये म्हणून मी माझा एक डोळा दिला. तुला खूप दिवसांपासून सांगावयाचे होते, पण सांगू शकले नाही.

आई या शब्दात विलक्षण जादू असल्याचे म्हटले जाते. आधुनिक युगात मात्र यशोदांच्या नशिबी नरकयातना येत आहेत.