Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Aurangabad › मुख्यमंत्री, अर्थमंत्री पैसेच देत नाहीत

मुख्यमंत्री, अर्थमंत्री पैसेच देत नाहीत

Published On: Jan 11 2018 1:38AM | Last Updated: Jan 11 2018 8:10AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

मुख्यमंत्री, अर्थमंत्री पैसेच देत नाहीत. मी तरी काय करू शकतो, विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनादेखील पैसे न मिळाल्याने पूर्ण होऊ शकल्या नाहीत, अशा शद्बांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपली बुधवारी हतबलता व्यक्‍त केली. 

कन्नड तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण करणार, अशी विचारणा करून आ. हर्षवर्धन जाधव यांनी लोणीकर यांना चिकलठाणा विमानतळावर घेरावा घातला. त्यांच्यासोबत विविध गावचे सरपंचदेखील उपस्थित होते. कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजना केव्हा पूर्ण करणार, अशी विचारणा आ. जाधव यांनी केली असता, ‘कन्नड तालुक्याप्रमाणेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांची कामेदेखील अपूर्ण आहेत. बागडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीस मुख्यमंत्रीदेखील उपस्थित होते. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी 700 कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, मात्र प्रत्यक्षात दोनशे कोटी रुपयेच मिळाले. मुख्यमंत्री, अर्थमंत्री पैसेच देत नसतील तर मी काय करू शकतो. पैसेच मिळत नसतील तर नुसत्या मंजुरी देऊन उपयोग काय उपयोग, अशी हतबलता लोणीकर यांनी व्यक्‍त केली.

म्हणे कर्जमाफीचा अडसर 

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीमुळे निधी मिळण्यात अडचणी येत आहेत, असे लोणीकर यांनी स्पष्ट केले असता, कर्जमाफीचा निर्णय नुकताच झाला. कन्नड तालुक्याला गेल्या चार वर्षांपासून एक छदामही मिळाला  नाही, असे आ. जाधव यांनी निदर्शनास आणून दिले असता, येत्या मार्चमध्ये कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी दिला जाईल, अशी घोषणा लोणीकर यांनी या वेळी केली.

कन्नड मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसाठी मी गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. राज्यात युतीचे सरकार आल्यावर तरी योजना मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांच्याकडेही मी सातत्याने पाठपुरावा करतोय. मात्र केवळ आश्‍वासने दिली जात आहेत. 
- आ. हर्षवर्धन जाधव.