Wed, Mar 27, 2019 06:29होमपेज › Aurangabad › कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम गुरुजींना तरी झेपेल का ?

कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम गुरुजींना तरी झेपेल का ?

Published On: Jun 15 2018 1:03AM | Last Updated: Jun 15 2018 12:22AMभाग्यश्री जगताप 

शिक्षण क्षेत्रात काळानुरूप वारंवार बदल केले जातात. ते बदल होणे अपेक्षितही असते. याचा ताण थेट शिक्षकांवर पडतो. अनेक वेळा शिक्षणेतर कामे दिल्याने त्या विरोधात शिक्षकांमधून ओरडही होत असते. यंदा असा वेगळा ताण नसला तरी दहावीचा अभ्यासक्रम चांगलाच बदलला असून त्यात विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असणार आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने शिकवणार्‍या गुरुजींना आता विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याचा अभ्यासक्रम झेपणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या कृतियुक्त अभ्यासक्रमाकडे गुरुजी कशा पद्धतीने पाहतात यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

दहावीत घेतलेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात काय फायदा होतो, याचे गणित मांडल्यानंतर त्याचे उत्तर समाधानकारक न आल्याने अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा विकास व्हावा व त्याद्वारे त्याचे आयुष्य सुंदर बनावे, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्याला मिळावा, रोजगाराच्या संधी मिळवताना शिक्षणाचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. घोकंपट्टी करून गुण मिळवण्याच्या पारंपरिक पद्धतीला यामुळे आळा बसणार आहे. कृतियुक्त अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिकवलेल्या भागाची व्यावहारिक जीवनात सांगड घालत कौशल्य हस्तगत करूनच स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. त्याच्या विचार क्षमतेला वाव मिळणार आहे. याआधी विद्यार्थी घोकंपट्टी करून जसेच्या तसे उतारे लिहून काढायचे, पण आता त्याला काय समजले आहे, शिवाय त्याचे वैयक्तिक मत काय आहे, अशा प्रकारची उत्तरे विद्यार्थ्यांना लिहावी लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडा पाठ होण्यापेक्षा समजणे महत्त्वाचे असणार आहे आणि हे समजावताना शिक्षकांच्याही कौशल्याची कसोटी लागणार आहे.

‘बेस्ट फाईव्ह’ या गुणदानाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना कधी न ऐकलेले शंभरपैकी शंभर गुण मिळत गेले. मात्र, आता नवीन पॅटर्नमुळे गुणांची असणारी चढाओढ थंडावणार आहे. कारण यंदापासून ही पद्धत बंद होणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. मात्र, नको त्या सवयीप्रमाणे शिक्षण विभागाकडून ‘बेस्ट फाईव्ह होणार बंद’ ही वार्ता गुपित ठेवण्यात आली आहे.