Tue, Apr 23, 2019 13:55होमपेज › Aurangabad › विवाहितेचे जबरदस्तीने लग्न लावले; जामीन फेटाळला

विवाहितेचे जबरदस्तीने लग्न लावले; जामीन फेटाळला

Published On: Jan 21 2018 10:48AM | Last Updated: Jan 21 2018 10:48AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

विवाहितेला फसवून पळवून नेऊन अहमदाबादला जबरदस्तीने लग्न लावून दिल्याप्रकरणी दुसर्‍या महिला आरोपीचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी शुक्रवारी फेटाळला.

या प्रकरणी शहरातील विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, तिचा पती एक वर्षापासून हर्सूल कारागृहात आहे. फिर्यादीला केटरिंगचे काम लावण्याचे आमिष दाखवून आरोपी पवनकुमार जगदीशप्रसाद चौधरी (रा. मुकुंदवाडी) याने फिर्यादीला अहमदाबादला नेले. तेथे पंडित नामक व्यक्‍तीशी तिचा जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला. मात्र आईची प्रकृती ठीक नसल्याचे सांगून फिर्यादीने स्वतःची सुटका करून घेत औरंगाबाद गाठले. या गुन्ह्यात आरोपी पवनकुमार याला आरोपी फरजाना बेगम शेख जाहेद (38, रा. संजयनगर, बायजीपुरा) हिने मदत केली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. दोन्ही आरोपींना अटक होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीमध्ये व नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली होती. आरोपी पवनकुमार याने नियमित जामिनासाठी सादर केलेला अर्ज नुकताच फेटाळण्यात आला. दरम्यान, आरोपी फरजाना हिने नियमित जामिनासाठी कोर्टात सादर केलेला अर्जदेखील कोर्टाने शुक्रवारी फेटाळला. सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.