Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Aurangabad › भरधाव कारने चार तृतीयपंथींना उडविले, एक ठार          

भरधाव कारने चार तृतीयपंथींना उडविले, एक ठार          

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

भरधाव वेगाने निघालेल्या कारने दुचाकीस्वाराला हुलकावणी देऊन पाडल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात समोर उभ्या असलेल्या तृतीयपंथींच्या वेषातील चौघांना उडविले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री बीड बायपास रस्त्यावरील आदित्य हॉटेलसमोर घडली. उपचारादरम्यान त्यातील एकाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे. राजू हरिश्‍चंद्र लोहाडे (38, रा. चित्तेपिंपळगाव) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अपघातानंतर कारचालक तेथून पसार झाला.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाई परिसरातील नाईकनगर येथे राहणारा नितेश विजय जाधव (23) हा तरुण वाळूज औद्योगिक परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजता ड्युटी संपल्यानंतर तो दुचाकी (क्र. एमएच- 20 सीव्ही -0787) वर बसून नाईकनगरकडे जात होता. बीड बायपास रोडवरील हॉटेल आदित्यसमोर त्याच वेळी भरधाव वेगाने आलेली स्कोडा कार (क्र. एमएच-20 सीएच-6288) च्या चालकाने नितेशच्या दुचाकीला हुलकावणी दिली. त्यामुळे नितेशचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर मात्र, या कारचालकाने तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात समोर रस्त्याच्या कडेलाच उभे असलेल्या चार तृतीयपंथींच्या अंगावर भरधाव कार घातली. या धडकेने चारही तृतीयपंथी गंभीर जखमी झाले. त्या धडकेनंतर अखेर ती कार थांबली. त्यानंतर क्षणातच कारचालकाने भीतीपोटी कार तेथेच सोडून

हॉटेलच्या दिशेने पळ काढला. 

अपघाताची माहिती मिळताच सातारा व पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी होऊन पडलेल्या त्या तरुणासह राजू हरिश्‍चंद्र लोहाडे, रोहन देवीदास साळुंके (23, रा. चंदनझिरा, जालना), मुकेश मोहन कदम (28, रा. सुंदरनगर, जालना) व मंदा रमेश जाधव (34, रा. चंदनझिरा, जालना)  या पाच जणांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजू लोहाडे यांचा शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, हवालदार एकनाथ चव्हाण हे तपास करत आहेत.

राजू तृतीयपंथींच्या वेषातील बहुरूपी

या अपघातात मरण पावलेल्या राजू लोहाडेची शनिवारी सायंकाळपर्यंत ओळख पटलीच नव्हती. उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी माहिती काढल्यावर ते चित्तेपिंपळगावचे असल्याचे कळाले. पोलिसांनी त्यांच्या मेहुणीस मोबाइलवरून फोटो पाठविल्यानंतर तिने तो राजू असल्याचे ओळखले. त्यानंतर सायंकाळी राजूचे वडील घाटीत आले. दरम्यान, राजू हे तृतीयपंथीसारखी वेशभूषा करून वावरत असले तरी ते तृतीयपंथी नाहीत. त्यांचे लग्न झालेले असून एक मुलगा असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

‘तो’ कारचालक कोण

बीड बायपास रस्त्यावरील आदित्य हॉटेलसमोर आपल्या ताब्यातील स्कोडा कार ही भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस्वारास जखमी करून चार जणांना उडविणार्‍या आणि त्यातील एकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेला तो ‘खरा’ कारचालक कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा कारचालक अपघातानंतर जवळच एका हॉटेलमध्ये घुसला होता. तो दारू पिलेला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ती गाडी एका हॉटेल मालकाची आहे. आता या प्रकरणी 304 अ गुन्हा शनिवारी सायंकाळी दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरटीओकडून कारचा मालक कोण हे तपासून बघितल्यानंतर त्याला अटक करणार असल्याचे पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले.