Fri, Jul 19, 2019 16:01होमपेज › Aurangabad › ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करणार

ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करणार

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:31AMलासूर स्टेशन : प्रतिनिधी

पावसाच्या लहरीपणामुळे सातत्याने आपल्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करत गंगापूर तालुक्यात सुमारे पंचवीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणारी ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना टप्पा-3 ही योजना राबविली जाईल. याशिवाय लासूर स्टेशनला स्वतंत्र पोलिस ठाणे आणि रेल्वे उड्डाणपूलही लवकरच उभारण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जानकी देवी बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून गंगापूर तालुक्यात राबविण्यात येणार्‍या 262 कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ रांजणगाव पोळ येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. 

त्यानंतर लासूर स्टेशन येथील गीताबन येथे आयोजित सभेत  मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, आमदार अतुल सावे, बजाज कंपनीचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास ट्रस्टचे चेअरमन चंद्रकांत त्रिपाठी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, काही वर्षांपासून राज्यात  दुष्काळ ही सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे. एक वर्षाआड आपल्याला दुष्काळ बघायला मिळत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून त्यावर मात करण्यासाठी गंगापूर तालुक्यात सुमारे पंचवीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना टप्पा - 3 ही योजना राबविली जाणार आहे. बजाज अ‍ॅटो लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंड तसेच लोकवर्गणीतून गंगापूर तालुक्यातील 110 गावांतील सुमारे 1 लाख 50 हजार एकर तलावातंर्गत असलेल्या जमिनीतील गाळ काढण्यात येणार असून याचा लाभ परिसरातील 25 हजार 847 कुटुंबांना होणार आहे, असे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून बजाज कुटुंबीय सामाजिक उपक्रम राबवितात, हे कार्य गौरवास्पद असून या जलसंधारण कामाच्या माध्यमातून अनेक शेतकरी सधन होणार आहेत. यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही. अशी विकास कामे सरकारही राज्यात ठिकठिकाणी  राबवत असल्याचे मुखमंत्र्यांनी सांगितले.
बजाज कंपनी व कंपनीचे कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सामाजिक कार्यात आपले अग्रगण्य काम असले पाहिजे, अशी बजाज कुटुंबीयांची धारणा आहे. त्या कामामुळे समाजाला होणारा फायदा मोठा आनंददायी आहे, असे यावेळी बजाज कंपनीचे व्हाईस चेअरमन मधुर बजाज यांनी सांगितले.

गेल्या डिसेंबर महिन्यात महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात अनेकांच्या आजारांचे निदान झाले आहे. अनेक रुग्णांपैकी एक हजार रुग्णांवर यशस्वीपणे शस्रक्रिया करण्यात आल्या. येत्या काही महिन्यांत उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे यावेळी आमदार बंब यांनी सांगितले.