Tue, Jul 16, 2019 02:08होमपेज › Aurangabad › बसस्थानक ६ तास रामभरोसे ठेऊन सर्वांचीच अधिकाऱ्याच्या साखरपुड्याला हजेरी

सर्व कर्मचारी साखरपुड्याला; बसस्थानक ६ तास रामभरोसे!

Published On: Feb 22 2018 11:08AM | Last Updated: Feb 22 2018 11:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मध्यवर्ती बसस्थानकातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी उतावळ्या झालेल्या सहायक अधिकारी, आगारातील कर्मचार्‍यांनी बुधवारी  तब्बल सहा  तास बसस्थानक रामभरोसे सोडल्याचा प्रकार पाहावयास मिळाला. विशेष म्हणजे रात्रपाळी करून आलेल्या चालक- वाहकांना उद्याची ड्युटी कधी, याची माहिती घेण्यासाठी  अधिकार्‍यांच्या फोनवर संपर्क  साधावा लागत होता, तर काही काळ बसचे नियोजन बिघडल्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. काही दक्ष नागरिकांनी थेट  परिवहन  मंत्र्यांकडेच तक्रार केल्याची चर्चाही बसस्थानक परिसरात होती. 

मध्यवर्ती बसस्थानकाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याचा बुधवारी साखरपुडा होता. त्यांच्या गैरहजेरीत काम करणार्‍या  सहायक अधिकार्‍यांनीही बुधवारी बॉसच्या साखरपुड्यासाठी  नवेळी दांडी मारली. विशेष बाब म्हणजे सहायक अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या ड्युटीचे नियोजन व बस फेर्‍यांचे नियोजन करण्याची तसदीही घेतली नाही, तर जबाबदारी ही कोणाकडे सुपूर्द केली नाही. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सहायक अधिकार्‍यांनी बिनधास्तपणे दांडी मारली होती. परिणामी रात्रीपाळी करून आलेल्या चालक- वाहकांची मोठी  तारांबळ उडाली होती. आपली उद्याची ड्युटी कधी आहे, रजेच्या अर्जावर  कोणाची सही घ्यायची यांसारख्या अनेक सम स्यांना कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागले, तर काही  कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांना फोनवर संपर्क साधून ड्युटीसंदर्भात विचारणाही केली. त्यामुळे बॉसच्या पुढे ‘हाजी-हाजी’ करणार्‍या सहायक अधिकार्‍यांना नागरिकांची गैरसोय करण्याचा  काही एक अधिकार नसल्याची खंतही काही कर्मचार्‍यांनी खासगीत बोलताना व्यक्‍त केली.

धुळे, पुण्याकडे जाणार्‍या बसचे काही काळ नियोजन विस्कळीत  झाल्याने  प्रवाशांनाही एस. टी. महामंडळाविरोधात संतप्त प्रतिक्रिया  व्यक्‍त केल्या. तसेच काही दक्ष नागरिकांनी परिवहन मंत्र्यांकडेच तक्रार केल्याची चर्चा मध्यवर्ती बसस्थानकात होती. याघटनेसंदर्भांत विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला; परंतु  त्यांचाकडून कोणताही प्रतिसादमिळाला नाही.