Tue, Nov 20, 2018 14:04होमपेज › Aurangabad › अधिकर्‍यांनो खबरदार, मोबाइल बंद ठेवाल तर...

अधिकर्‍यांनो खबरदार, मोबाइल बंद ठेवाल तर...

Published On: Feb 05 2018 1:29AM | Last Updated: Feb 05 2018 1:20AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एसटी महामंडळातील अनेक अधिकारी मोबाइल स्विच ऑफ करून वावरत असतात. अशा वेळी अपघात झाला किंवा इतर आपत्कालीन काळात त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, ही बाब वाहतूक महाव्यवस्थापकांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाइल बंद ठेवला तर एक महिन्याचा संपर्क  भत्ता न देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्याचे पत्र 3 फेब्रुवारी रोजी विभाग नियंत्रकांना पाठवले आहे. 

एसटी महामंडळातील वाहतूक अधिकारी, आगार प्रमुख, व विभागातील इतर अधिकारी काही तरी कारण सांगून मोबाइल बंद करून ठेवतात. एखाद्या वेळेस अपघात झाला किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर वरिष्ठ त्या अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मोबाइल बंद असल्याने त्यासंबंधी माहिती मिळण्यास अनेक अडचणी येतात. यामुळे यापूर्वी सर्वच अधिकार्‍यांना मोबाइल कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची ताकीद दिली होती. तरीही अधिकार्‍यांत मोबाइल बंद ठेवण्याचे प्रमाण वाढले होते. ही बाब एसटी प्रशासनाने गांभीर्याने घेतली घेतली आहे. 

यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 3 फेब्रुवारीला महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या सहीने सर्वच विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून यापुढे मोबाइल बंद ठेवाल तर एक महिन्याचा संपर्क भत्ता न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळवले आहे. या पत्रामुळे अधिकार्‍यांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असली तरी याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. एसटी महामंडळाच्या बडग्यामुळे मोबाइल बंद ठेवणार्‍या अधिकार्‍यांची मोठी पंचाईत झाली आहे.