Mon, Apr 22, 2019 21:44होमपेज › Aurangabad › तूर जाळली

तूर जाळली

Published On: Feb 10 2018 1:27AM | Last Updated: Feb 10 2018 1:03AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

तुरीला भुगा लागला, मुकण्या आणि हिरवे दाणेही आहेत. त्यामुळे तुमची तूर हमी भावाच्या निकषात बसत नाही, असे म्हणत नाफेडच्या तूर केंद्रावरील अधिकार्‍यांनी आठ ते दहा शेतकर्‍यांचा माल खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी शुक्रवारी (दि. 9) केंद्रावरच तूर जाळून निषेध नोंदवला. यावेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे केंद्रच काही वेळासाठी बंद पडले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीचा पेरा घटूनही यंदा शासनाने खरेदी केंद्रे सुरू करण्यास विलंब केला. त्यामुळे आधीच तूर उत्पादक शेतकरी संतप्त आहेत. त्यात आता निकषांचा कोलदांडा घालत तुरीच्या खरेदीस नकार दिला जात आहे. जाधववाडीतील बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्रावर शुक्रवारी अशाच प्रकारामुळे गोंधळ उडाला. वरूड काझी, वरझडी, टोणगाव, पिंप्री, श्यामवाडी येथील दहा ते बारा शेतकर्‍यांनी आपली तूर विक्रीसाठी केंद्रावर आणली. मात्र, यातील केवळ तीनच शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात आली, तर इतर आठ ते दहा जणांना तुमची तूर    निकषातच बसत नसल्याचे सांगत खरेदीस नकार दिला. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी तीच तूर जाळून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. यावेळी केंद्रावर एकच गोंधळ उडाला. अखेर केंद्रावरील जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खाडे आणि गुणनियंत्रक विनय डक यांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला. शेतकर्‍यांच्या समाधानासाठी काही जणांच्या तुरीची उपस्थितांसमोरच पुन्हा तपासणी करण्यात आली. मात्र, यावेळीही ती ‘रिजेक्ट’ करण्यात आली.

चाळणच लावली नाही
मळणीपूर्वी सर्वच तूर सारखी वाळलेली नसते, त्यामुळे काही प्रमाणात हिरवे दाणे, मुकण्याही येऊ शकतात. शेतातून थेट बाजारात माल येतो. त्यामुळे केंद्रावरच ती चाळून घ्यायला हवी. मात्र, अधिकारी तसे न करता पोत्यातूनच नमुने घेतात आणि रिजेक्टही करतात. मात्र, जालन्यातील केंद्रावर तुरीची चाळण करून खरेदी केली जाते. याच केंद्रावर सर्वाधिक तूर खरेदी झाली आहे. औरंगाबादेत मात्र, शेतकर्‍यांना माघारी पाठवले जात असल्याचा आरोप शेतकरी इलियास बेग यांनी केला.

दहा क्विंटल तूर विक्रीसाठी केंद्रावर आली, मात्र, निकषात बसत नसल्याचे सांगत अधिकार्‍यांनी खरेदीस नकार दिला आहे. आमची तूर का नाकारली, असे विचारायला गेल्यास सुरक्षा रक्षकांनी आम्हाला हाकलून लावले, असे शेतकरी कृष्णा दांडगे यांनी सांगितले.

शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच ‘इफेक्टिव्ह’ दर्जाच्या तुरीची खरेदी केली जात आहे. तक्रार करणार्‍या शेतकर्‍यांच्या तुरीची सर्वांसमोर नाफेडने नेमून दिलेल्या गे्रडरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांची तूर रिजेक्ट झाल्यानेच खरेदी नाकारण्यात आली, असे मार्केटिंग अधिकारी सी. डी. खाडे म्हणाले.