Tue, Apr 23, 2019 13:34होमपेज › Aurangabad › बहिणीला शेजार्‍यांचा त्रास; भावाची आत्महत्या

बहिणीला शेजार्‍यांचा त्रास; भावाची आत्महत्या

Published On: Mar 12 2018 1:03AM | Last Updated: Mar 12 2018 1:03AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

बहिणीला शेजारी त्रास देत असल्याने कंटाळून तिच्या भावाने आत्महत्या केल्याची घटना रांजणगाव परिसरात रविवारी सकाळी उघडकीस आली. आशिष धोंडिराम चोपडे (25, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत आशिषच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याविषयी पोलिसांनी सांगितले की,  रविवारी सकाळी आशिष हा रांजणगाव येथील किल्पटन वाईन शॉपीच्या पाठीमागील मोकळ्या जागेतील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला होता. त्यास बेशुद्ध अवस्थेत घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. दरम्यान नातेवाईकांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करा, अशी भूमिका घेत आशिषचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोर आणला होता.

यावेळी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून अगोदर मृतदेहावर अंत्यसंस्कार करा नंतर तुमची तक्रार दाखल करू, असे सांगितले. मात्र नातेवाईक गुन्हा दाखल करण्याबाबत ठाम राहिले. आशिष याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घराशेजारी राहणारे बाळू भालेराव, अमोल भालेराव त्याचे नातेवाईक विजय कोळसे, राजू तुपे व तुपेचा मित्र वाकोडे हे नेहमी वाईट नजरेने पाहून आपल्या मुलीला त्रास देत होते. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आशिष हा कंपनीत कामाला जात असताना किल्पटन वाईन शॉपीजवळ दारू पिऊन त्यांनी मुलास मारहाण केली होती. तेव्हापासून आशिष निराश झाला होता. शनिवारी सकाळी आशिष हा कंपनीतून रात्रपाळी करून घरी आला होता. दुपारी त्याला सागर ढोले व अमोल (विलास दाभाडे याचा भाचा) यांचा फोन आल्याने तो घराबाहेर पडला होता. 

रात्री आला वडिलांना फोन
सायंकाळपर्यंत तो घरी न आल्यामुळे सात वाजेच्या सुमारास आशिषच्या वडिलांनी त्याला फोन करून विचारले. त्यावेळी आशिषने कंपनीत ड्युटीला चाललो आहे, असे सांगितले होते. त्यानंतर रात्री त्यांना पावणेनऊ वाजेच्या सुमारास फोन आला. मी मनोज बोलत असून आशिष कंपनीत ड्युटीला आहे, काही काळजी करू नका, असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला. रविवारी सकाळी त्यांना आशिषने गळफास घेतल्याचे समजले. याप्रकरणी आशिषचे वडील धोंडिराम चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फौजदार आरती जाधव या करीत आहेत.