होमपेज › Aurangabad › शोध लागू नये म्हणून ‘त्याने’ नावच बदलले

शोध लागू नये म्हणून ‘त्याने’ नावच बदलले

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

26 जानेवारी रोजी देऊळगावराजा (जि. बुलडाणा) येथून बेपत्ता झालेला 16 वर्षीय मुलगा औरंगाबादेत आला. पोलिसांनी शोधू नये म्हणून त्याने चक्क नाव बदलून जयभवानी नगर भागात राहण्यास सुरुवात केली. अखेर, सोशल मीडियाचा वापर करून मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला शोधले अन् नातेवाइकांच्या स्वाधीन केले.  

देऊळगावराजा येथील विठ्ठल (नाव बदललेले आहे) नावाचा मुलगा दहावीत शिक्षण घेतो, परंतु त्याचे घरात आई-वडिलांशी पटत नाही. त्यामुळे त्याने मामाकडे जाण्याचा आग्रह धरला. पण, वडिलांनी त्यालाही विरोध केला. त्यामुळे 26 जानेवारीला काहीही न सांगता विठ्ठल घरातून बेपत्ता झाला. त्याने सरळ औरंगाबाद गाठले. जयभवानीनगर परिसरात तो नाव बदलून राहिला. येथे त्याने सोनू नाव सांगितले होते. विशेष म्हणजे, घरी कोणीही नाही, अशी कथा सांगून त्याने केटरर्समध्ये कामही सुरू केले. मुकुंदवाडी पोलिसांना देऊळगावराजा पोलिसांनी संपर्क साधून जयभवानीनगर परिसरात विठ्ठल राहात असल्याची माहिती दिली. त्यानुसार, उपनिरीक्षक संजय बनसोड व त्यांच्या सहकार्‍यांनी शोध सुरू केला. जय भवानीनगर भागात छायाचित्र दाखवून तसेच विविध सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून शोधमोहीम सुरू ठेवली. त्यादरम्यान, त्यांना हा मुलगा नाव बदलून राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला शोधले.