औरंगाबाद : प्रतिनिधी
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापकांनी टाकलेला बहिष्कार कायम असल्याने सुमारे 700 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे मंडळाच्या कार्यालयात तसेच पडून आहेत. उत्तरपत्रिका तपासाव्यात यासाठी मंडळातील अधिकारी शिक्षकांची मनधरणी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत, तर दहावीच्या परीक्षा सुरू होऊन जवळपास 20 दिवस उलटले आहेत. मात्र, प्राध्यापकांनी, तसेच शिक्षकांनी या उत्तरपत्रिका तपासणीसाठी नेलेल्या नाहीत. अनेक आंदालने करूनही शासन शाळा, महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देत नाही म्हणून यावर्षीही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे, असे विविध विनाअनुदानित संघटनांकडून सांगण्यात आले आहे. त्या संदर्भात संघटनांनी बोर्डात सचिवांकडे निवेदनेही दिली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील 95 शाळांतील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी घेतल्या आहेत, तर 304 विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी घेतलेल्या नाहीत, त्यामुळे आता या शिक्षकांचे समुपदेशन करणे तसेच मुख्याध्यापकांच्या बैठका घेणे यासारख्या शिक्षकांच्या मनधरणीसाठीच्या हालचाली मंडळात सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले.