Mon, May 20, 2019 10:46होमपेज › Aurangabad › अफवेचा ‘स्फोट’, व्हेंटिलेटरवरील रुग्णांनी ठोकली धूम

अफवेचा ‘स्फोट’, व्हेंटिलेटरवरील रुग्णांनी ठोकली धूम

Published On: Dec 10 2017 11:46AM | Last Updated: Dec 10 2017 11:41AM

बुकमार्क करा

औरंगाबाद प्रतिनिधी

घाटी रुग्णालयातील नवजात बालकांसाठीच्या वॉर्डमध्ये (क्र. 24) मध्ये शनिवारी(दि. 9) दुपारी ऑक्सिजन सिलिंडर खाली पडल्याने मोठा आवाज झाला. या आवाजामुळे मग अफवेचाच ‘स्फोट’ केला. स्फोट झाला... स्फोट झाला... म्हणत रुग्णांच्या नातेवाईकांनी तर धूम ठोकलीच ठोकली, काहींनी तर चक्क आपल्या उपचार घेत असलेल्या व्हेंटिलेटरवरील मुलांनाही तेथून उचलून बाहेर पळ काढाला. क्षणातच हा वॉर्ड रिकामा झाला. काही वेळानंतर ही अफवा असल्याचे समजल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. या पळापळीत चेंगराचेंगरीझाली नाही, हे सुदैवच म्हणावे लागेल. 

घाटीत वॉर्ड नं. 24 हा लहान मुलांचा वॉर्डआहे. येथेच लहान मुलांना व्हेंटिलेटर लावले जाते. दुपारी सिलिंडर बदलण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांकडून सिलिंडर खाली पडले. यामुळे थोडा मोठा आवाज झाला. तेथे असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला वाटले स्फोट झाला आणि त्याने धावतच मोठ्याने स्फोट झाल्याची ओरड केली. यामुळे सर्वच घाबरले. नातेवाईक रुग्णांना घेऊन वॉर्डाबाहेर पळत सुटले. काही व्हेंटिलेटरवर असलेल्या लहान बालकांनाही तेथून हटविण्याची घाई सुरू झाली. क्षणार्धात संपूर्ण वॉर्ड रिकामा झाला. गोंधळ उडाल्याचे पाहून डॉक्टर्स व सुरक्षारक्षकांनी तिकडे धाव घेतली. अफवा असल्याचे लक्षात येताच त्यांनी उपस्थिताना समजावून सांगत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यानंतर रुग्ण पुन्हा वॉर्डात पोहचले. मोठी दुर्घटना टळली ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची अफवा पसरल्यानंतर वॉर्ड नं. 24 मध्ये एकच गोंधळ उडाला.

नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याच वॉर्डात एका खोलीत गंभीर आजारी बालकांसाठी व्हेंटिलेटरची सोय आहे. अफवा पसरली तेव्हा येथे व्हेंटिलेटरवर काही बालके होती. स्फोटाच्या भीतीमुळे उपस्थित काही पालकांनी व्हेंटिलेटर काढून रुग्णांना घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. यात तीन ते चार बालकांचे व्हेंटिलेटर काढले होते. उपस्थित डॉक्टर तसेच कर्मचार्‍यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत बालकांचे व्हेंटिलेटर पुन्हा पूर्ववत केले. या बालकांचे काही वेळ जरी व्हेंटिलेटर निघाले असते तर, ऑक्सिजनअभावी बालकांचा मृत्यू झाला असता. डॉक्टर्स कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हे मोठे संकट टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घाटीत आपत्कालीन व्यवस्थेचा अभाव घाटी हे मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. 

या रुग्णालयात बाराशे खाटांची सुविधा असताना, येथे दररोज जवळपास पंधराशे ते सोळाशे रुग्ण भरती असतात. हजारो लोकांची दररोज येथे वर्दळ असते. अपघात विभागाची इमारत ही जुन्या बांधकाम रचनेवर आधारलेली आहे. घाटीत जर यदाकदाचित अशी घटना घडली तर आपत्कालीन व्यवस्था नसल्याचे दिसून येते. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, असे मत काही तज्ज्ञ व्यक्‍त करतात

सलिंडर बसविताना झालेल्या आवाजामुळे रुग्णांच्या काही नातेवाईकांनी स्फोट झाल्याचा विचार करीत तेथून धूम ठोकली. यामुळे सर्व वॉडार्र्ंत धावपळ उडाली. डॉक्टर व कर्मचार्‍यांनी
तत्काळ धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. सर्व रुग्ण तसेच नातेवाईक सुरक्षित आहेत. घाटीकडे अशा दुर्घटना टाळण्यासाठी व्यवस्था आहे.असे डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.