Fri, Jul 19, 2019 05:34होमपेज › Aurangabad › माझी नाही, तर कोणाचीच नाही म्हणत तरुणीवर हल्ला

माझी नाही, तर कोणाचीच नाही म्हणत तरुणीवर हल्ला

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 1:38AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असताना लग्नाला नकार देणार्‍या तरुणीवर तरुणाने ब्लेडने हल्ला केला. ‘तू माझी नाही, तर कोणाचीच होऊ देणार नाही’ असे म्हणत हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार 17 डिसेंबर रोजी मुकुंदवाडीत घडला. यात तरुणी जखमी झाली असून तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला. अजय गायकवाड असे तरुणाचे नाव असून बबिता आणि भैयासाहेब गायकवाड असे आई-वडिलांचे नाव आहे. यातील बबिता गायकवाड यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकुंदवाडीतील 22 वर्षीय तरुणीचे अजय गायकवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे अजयने तिच्याकडे लग्‍नाचा तगादा लावला होता, परंतु तो दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने तरुणीने नकार दिला. दरम्यान, 17 डिसेंबर रोजी अजय, त्याची आई आणि वडील तरुणीच्या घरी गेले. त्यांनी तरुणीला तसेच तिच्या आईला मारहाण केली. त्यानंतर अजयने तिच्यावर ब्लेडने हल्ला केला. यात तिच्या गळ्यावर, गालावर, बोटावर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर अजयने तेथून धूम ठोकली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात प्राणघातक हल्ला केला म्हणून गुन्हा नोंद झाला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. एच. खटावकर करीत आहेत.