Tue, Apr 23, 2019 20:26होमपेज › Aurangabad › युतीतील भांडणाचा राष्ट्रवादीला फायदा

तयारी विधानसभेची: युतीतील भांडणाचा राष्ट्रवादीला फायदा

Published On: Mar 12 2018 1:03AM | Last Updated: Mar 12 2018 1:03AMपैठण : गौतम बनकर  

पैठण मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून जोरात सुरू आहे. या मतदारसंघातून आपलाच उमेदवार निवडून यावा म्हणून सत्ताधारी भाजपने चांगली फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसून येत आहे. या पक्षाकडून चार उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, तर शिवसेनेकडून आमदार संदिपान पाटील भुमरे हे आपल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतीपदावर असलेल्या पुत्राला रिंगणात उभे करण्याच्या तयारीत आहेत. सेनेकडून 3 जण इच्छुक असून राष्ट्रवादी 3, मनसे आणि अपक्षाकडून प्रत्येकी एक जणाने आतापासून निवडणूक लढण्यास गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. एकंदरीत या मतदार संघात आपला सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मतांची विभागणी होऊन त्याचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फायदा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.  

पैठण विधानसभा मतदारसंघात 2 लाख 41 हजार 614 एवढे  मतदार आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीत आमदार भुमरे 66 हजार 952 मते घेऊन विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे यांचा त्यांनी 25 हजार 39 मतांची आघाडी घेऊन पराभव केला होता. वाघचौरे यांना 41 हजार 952 मते मिळाली होती. त्या खालोखाल भाजपने ऐनवेळेवर आयात केलेले विनायक हिवाळे यांना 29 हजार मते मिळाले होती. 2014 च्या निवडणुकीत बाहेरचा उमेदवार असतानाही भाजपने 29 हजार मते घेतली होती. हिवाळे तिसर्‍या क्रमांकावर होते. यावेळी तर केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता आहे. याशिवाय पैठण नगर परिषद, संत एकनाथ साखर कारखाना देखील भाजपच्या ताब्यात आहे. यामुळे आपला उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, असा अंदाज बांधून भाजपने मतदारसंघात चांगली फिल्डिंग लावली असून कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या भेटीवर भर दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजपचे तालुका अध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन तुषार पाटील शिसोदे, मनसेतून आलेले डॉ. सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिलेले अ‍ॅड. कांताराव औटे, शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे प्रल्हाद औटे हे चार जण सध्या भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपच्या उमेदवाराच्या चारीमुंड्या चित करण्यासाठी शिवसेनेकडून आमदार भुमरे हे आपले पुत्र जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विलास भुमरे यांना रिंगणात उभे करण्याच्या तयारीत आहेत. पुत्राला तिकिट मिळाले नाही तर मग स्वतः निवडणूक लढवतील. याशिवाय माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील गोर्डे यांचे सेनेकडून नाव चर्चेत आहे.