Sat, Aug 24, 2019 23:44होमपेज › Aurangabad › अट्टल दुचाकी चोर पिशोर पोलिसांच्या जाळ्यात

अट्टल दुचाकी चोर पिशोर पोलिसांच्या जाळ्यात

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 14 2018 12:16AM

बुकमार्क करा
पिशोर : प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांतून दुचाकी चोरी करायची. त्याच्यावर वाटेल तो क्रमांक टाकायचा अन् मिळेल त्या किमतीत कुणाला तरी ती दुचाकी विकायची, असा ‘उद्योग’ करणार्‍या एका अट्टल चोरट्याला पिशोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

राहुल बाजीराव बिरारे (22, रा. दिगर, पिशोर, ता. कन्नड) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून आतापर्यंत चोरीच्या तब्बल 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कन्नड तालुक्यातील माळेगाव ठोकळ येथील सुरेश ठोकळ यांनी शाईन दुचाकी (क्र. एमएच- 20- डीवाय- 1869) ही 5 जानेवारी रोजी पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर चोरी गेली होती. या प्रकरणी पिशोर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ठोकळ यांच्या दुचाकीसारखीच एक गाडी आरोपी राहुल बिरारे या तरुणाकडे आहे, अशी माहिती खबर्‍याकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच अधीक्षक आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, गुन्हे शाखेचे निरीक्षक भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित मोरे, फौजदार भटर, जमादार एस. पी. देवरे, संजय शिंदे, संजय आटोळे, कैलास वाघ, बी. एस. ढेरे, सतीश देवकर, डी. डी. जाधव यांनी राहुल बिरारेचा शोध सुरू केला. अखेर 10 जानेवारी रोजी तो घरी सापडला. त्याच्याकडे एक शाईन मोटारसायकलही सापडली. मोटारसायकलच्या कागदपत्रांची पोलिसांनी मागणी केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. ‘खाक्या’ दाखविताच त्याने तोंड उघडले. ही दुचाकी चोरीची आहे, आपण ती पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर चोरी केली होती, अशी स्पष्ट कबुली त्याने दिली. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांतून आतापर्यंत अकरा दुचाकी चोरल्याचेही त्याने कबूल केले. मग पोलिसांनी त्याने चोरीच्या दुचाकी ज्यांना विकल्या होत्या, त्यांच्याकडून त्या जप्त केल्या. आतापर्यंत अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

क्रमांक बदलून विकायचा गाड्या

आरोपी राहुल बिरारे हा विविध भागांतून दुचाकी चोरी करायचा. घरी आल्यानंतर त्या गाड्यांवरील नंबर तो बदलत असे. मग मला पैशांची गरज आहे, ही गाडी घ्या, असे सांगून तो ग्राहक शोधायचा. ग्राहकाने मागेल त्या किमतीत गाडी विकायचा. कागदपत्र चार-पाच दिवसांमध्ये आणून देतो, असे सांगून पैसे घेऊन तो गायब व्हायचा, अशाच पद्धतीने भोळेभाबडे ग्राहक शोधून त्याने चोरीच्या गाड्या विकल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्‍त केली.