Thu, Nov 22, 2018 01:29होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : हमी भावाच्या मागणीसाठी बाजार समितीत आंदोलन

औरंगाबाद : हमी भावाच्या मागणीसाठी बाजार समितीत आंदोलन

Published On: Feb 17 2018 1:27PM | Last Updated: Feb 17 2018 1:27PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शेतीमालाची शासनानेच ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यात यावी, तूरीची प्रतिक्‍विंटल पाच हजार ४५० रुपयांप्रमाणे खरेदी करा, उशिराने तूर खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकर्‍यांची तीन महिने झालेली लूट भरून द्या, या मागण्यांसाठी जय किसान आंदोलन, मराठवाडा लेबर युनियन आणि स्वराज अभियानतर्फे बाजार समितीवर शनिवारी (दि. १७) आंदोलन करण्यात आले.

शेतकरी जगला, तर देश जगेल, सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, शेतकर्‍यांची लूट थांबवा, अशा घोषणांनी बाजार समिती परिसर दणाणून सोडला. सरकारने ठरविलेला हमी मिळत नसल्याच्या शेतकरी तक्रारी करत आहेत, तूरीचा भाव ५ हजार ४५० ठरवलेला असताना व्यापारी ३ हजार आठशे ते ४ हजार पाचशे भावाने खरेदी करत असून प्रतिक्‍विंटल नऊशे ते दीड हजारांची लूट केली जात आहे. उशिराने खरेदी केंद्र सुरू झाल्याने व्यापार्‍यांना कमी भावात तूर द्यावी लागली, शेतकर्‍यांच्या या लूटीस जबाबदार कोण, नोव्हेंबरमध्ये सरकारी खरेदी केंद्र सुरू का केले नाही, असे प्रश्‍न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले. यावेळी हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, डॉ. सुधीर देशमुख, सरचिटणीस देविदास किर्तीशही यांची उपस्थिती होती.

मागण्या :

आंदोलकांतर्फे बाजार समिती सभापतींना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकर्‍यांचे झालेले नुकसान सरकार किंवा बाजार समितीने भरून देण्याची मागणी केली आहे. तसेच तूरी प्रमाणेच शेतकर्‍यांना इतर शेतीमालाची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमूक्‍त करा, बाजार समिती हद्दित, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजाणी करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.