Tue, Apr 23, 2019 23:35होमपेज › Aurangabad › सेनेचे जि. प. अध्यक्षपद भाजप हिसकावणार

सेनेचे जि. प. अध्यक्षपद भाजप हिसकावणार

Published On: Jan 20 2018 2:04AM | Last Updated: Jan 20 2018 1:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने काबीज केलेले औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे घेण्यासाठी भाजपचे नेते सक्रिय झाले आहेत. त्यासाठी भाजपने शुक्रवारी एक गुप्त बैठकही घेतली. विशेष म्हणजे भाजपाच्या या बैठकीला काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही सदस्यांनी हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या मनसुब्यांना बळ मिळाले असून लवकरच सेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद गमवावे लागणार, हे निश्‍चित मानले जात आहे. 

निवडणुकीत सर्वाधिक 23 जागा जिंकूनही भाजपला शिवसेनेने खेळलेल्या खेळीमुळे अध्यक्षपदापासून वंचित राहावे लागले होते. 18 सदस्य असलेल्या शिवसेनेने काँग्रेसच्या 16 सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्षपद ताब्यात घेतले होते. शिवसेनेच्या अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांना अध्यक्ष करण्यात आले. शिवसेनेच्या या खेळीचे शल्य भाजपला बोचत आहे. त्यातच शिवसेनेनेही भाजपला गेल्या वर्षभराच्या काळात सतत डिवचण्याचा प्रयत्न केला. मग तो निधी वाटपाचा मुद्दा असो, की सभेमध्ये आवाज दाबण्याचा प्रश्‍न असो.  त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते शिवसेनेला जिल्हा परिषदेत धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून सेनेला हटविण्यासाठी भाजप आ. प्रशांत बंब यांनी पुढाकार घेतला आहे. अखेर शिवसेना आणि काँग्रेसचेच काही सदस्य गळाला लागल्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना पाठबळ मिळाले आहे. 

शहरात गुप्त बैठक
जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यासाठी भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेतील सदस्यांची एक गुप्त बैठक शुक्रवारी शहरात झाली. विशेष म्हणजे या बैठकीला अध्यक्ष अ‍ॅड. डोणगावकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले शिवसेना आणि काँग्रेसचे काही सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अविश्‍वास ठरावावर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीला आ. प्रशांत बंब यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षांवर अविश्‍वास दाखल केल्यानंतर तो पारित करण्यासाठी संख्याबळ कसे जमा करता येईल, आणखी कोण कोण आपल्या बाजूने येऊ शकते, याबाबत चर्चा झाली. 

एका अधिकार्‍याचाही पुढाकार
जिल्हा परिषद अध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावून घेण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना एका बड्या अधिकार्‍याचाही हातभार असल्याचे समजते. सदस्य फोडाफोडीसाठी लागणार्‍या खर्चाबरोबरच इतर खर्च  उचलण्याची जबाबदारीही या अधिकार्‍याने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

असे आहे संख्याबळ
 भाजप 23, शिवसेना 18, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 3 आणि मनसे 1, रिपाइं-डेमोक्रॅटिकचे 1
एकूण 62­