Sat, Jul 20, 2019 10:49होमपेज › Aurangabad › पथदिव्यांवर मनपाची तिहेरी उधळपट्टी

पथदिव्यांवर मनपाची तिहेरी उधळपट्टी

Published On: Feb 09 2018 2:17AM | Last Updated: Feb 09 2018 2:05AMऔरंगाबाद : सुनील कच्छवे

महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून एकाच कामासाठी अनेक प्रकारे उधळपट्टी केली जात आहे. पालिकेने संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे बसविणे आणि त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम एकाच ठेकेदाराला दिलेले आहे. तरीदेखील पालिकेने पथदिव्यांच्या नवीन दीडशे कामांना नुकतीच मंजुरी दिली आहे. ही उधळपट्टी इथेच थांबलेली नाही, आता पालिकेने देखभाल दुरुस्तीचे काम करणार्‍या जुन्या 22 ठेकेदारांनाही मार्चपर्यंतची मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे. 

शहरात पथदिव्यांचे सुमारे 45 हजार खांब आहेत. मनपाने संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे बसविणे आणि पुढील पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे कंत्राट 114 कोटी रुपयांना एका एजन्सीला दिले आहे. या ठेकेदार एजन्सीने महिनाभरापासून शहरात काम सुरू केले आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील विद्युत कामांची जबाबदारी आता या एजन्सीकडे आली आहे. तरीदेखील मनपाने शहरात विविध ठिकाणी पथदिवे बसविण्याच्या कामांच्या तब्बल दीडशे संचिका नुकत्याच मंजूर केल्या आहेत. शिवाय आणखी तीनशे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु आता या दोन कामांसोबतच मनपाने देखभाल दुरुस्तीचे काम करणार्‍या जुन्या 22 ठेकेदारांनाही मुदतवाढ दिल्याची माहिती हाती आली आहे. मनपाकडून मागील अनेक वर्षांपासून या 22 ठेकेदारांकडूनच शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जात होते. आता 114 कोटींच्या कंत्राटदाराने काम केल्याने या ठेकेदारांची कामे बंद होणे अपेक्षित होती, परंतु मनपा प्रशासनाने या ठेकेदारांनादेखील तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मुळात 114 कोटींचे कंत्राट घेतलेल्या एजन्सीकडेच देखभाल दुरुस्तीचे कामही दिलेले आहे. त्यामुळे या जुन्या कंत्राटदारांना कामच राहिलेले नाही, तरीदेखील ही मुदतवाढ दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.