Thu, Jun 27, 2019 15:53होमपेज › Aurangabad › औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील पीडिता बेपत्ता

औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील पीडिता बेपत्ता

Published On: Jun 29 2018 9:29AM | Last Updated: Jun 29 2018 9:29AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

उपायुक्‍त (परिमंडळ-2) राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार करणारी तरुणी गुरुवारीही सापडली नाही. तिच्या शोधासाठी पोलिसांनी सिडको ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह चार पोलिसांचे एक पथक कामाला लावले असून त्यांनी पीडितेचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती तपास अधिकारी उपायुक्‍त (परिमंडळ-1) विनायक ढाकणे यांनी गुरुवारी (दि. 28) दिली.

नोकरीचे आमिष दाखवून पोलिस महिलेच्या 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी श्रीरामे यांच्याविरुद्ध बुधवारी एमआयडीसी सिडको ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस दलात खळबळ उडवून देणार्‍या या गुन्ह्याचा पोलिसांनी अतिशय सावध तपास सुरू केला आहे.

पीडितेने व्हाट्सअ‍ॅपवरून केलेल्या तक्रारीवरूनच गुन्हा नोंदविल्यामुळे संपूर्ण घटनाक्रम अजून तपास अधिकार्‍यांनाच नीट समजलेला नाही. म्हणून आधी पीडितेचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिस तिच्या मोबाइल क्रमांकावर सतत संपर्क साधत असून तपासासाठी तिला हजर होण्याबाबत मेसेजही टाकत आहेत.  याशिवाय सिडको ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, एमआयडीसी सिडको ठाण्यातील उपनिरीक्षक क्रांती निर्मळ आणि दोन महिला पोलिसांचे पथक तयार केले असून ते पीडितेच्या घरी जाऊन आले, मात्र ती सापडली नाही.

‘त्या’ निरीक्षकांचाही जबाब घेणार
पोलिसांत जाण्याची भाषा वापरल्यानंतर पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती आणि शिवाजी कांबळे यांनी घरी येऊन तक्रार करू नको म्हणून धमकावल्याचा आरोप पीडितेने व्हाट्सअ‍ॅप तक्रारीत केला आहे. त्यामुळे लवकरच प्रजापती आणि कांबळे यांचे जबाब नोंदवून प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पोलिस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांनी सांगितले.

व्हाट्सअ‍ॅपवरील तक्रारीवरूनच गुन्हा का?
पोलिस आयुक्‍तांकडे तोंडी तक्रार केल्यानंतर तत्काळ कारवाई होईल, अशी पीडितेला अपेक्षा होती. मात्र, आयुक्‍तांनी श्रीरामे यांना रजेवर पाठवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवस लोटल्यावर पीडितेने महिला तक्रार निवारण केंद्रात व्हाट्सअ‍ॅपवरून तक्रार नोंदविली. त्यानुसार, पोलिसांनी पीडितेला बोलावून घेत तक्रारीवर तिची स्वाक्षरी घेतली आणि तिला एमआयडीसी सिडको ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर पीडिता ठाण्यात गेलीच नाही, असा पोलिसांचा दावा आहे. आतापर्यंत ती न सापडल्याने कदाचित उद्या आपणही अडचणीत येऊ म्हणून तिच्या व्हाट्सअ‍ॅपवरून आलेल्या तक्रारीवरूनच हा गुन्हा नोंदविल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

राहुल श्रीरामेंच्या निलंबनाची शक्यता
गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस उपायुक्‍त राहुल श्रीरामे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. ते अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असल्याने निलंबनाचा निर्णय केवळ शासन पातळीवरच होऊ शकतो. पोलिस आयुक्‍तालयातून एक अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयात पाठवण्यात येईल. त्यावरून महासंचालक कार्यालय गृहविभागाशी पत्रव्यवहार करेल. त्यानंतर शासन पातळीवरच पुढील निर्णय होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.