Mon, Mar 25, 2019 18:05होमपेज › Aurangabad › दोन महिने उलटूनही २५ कोटींचे अंदाजपत्रक तयार होईना  

दोन महिने उलटूनही २५ कोटींचे अंदाजपत्रक तयार होईना  

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 09 2018 12:26AM

बुकमार्क करा
प्रतिनिधी : औरंगाबाद

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून सातारा देवळाईतील एकही रस्ता घेण्यात आला नाही. त्यामुळे सातारा देवळाईत रस्त्यांची कामे करण्यासाठी वेगळी 25 कोटींची मंजुुरी देऊन त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले होते. मात्र आदेश देऊन दोन महिने झाले तरी अंदाजपत्रक केले नसल्याने नगरसेवक राजू वैद्य यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला केला. त्यामुळे कार्योत्तर मान्यता देऊ; पण प्राधान्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश सोमवारच्या सर्वसाधारण सभेत घोडेले यांनी प्रशासनाला दिले.

मनपाने शहरातील रस्ते करण्यासाठी दिडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. मात्र यात एकही रस्ता सातारा आणि देवळाईचा घेतला नाही. तसेच सिडकोच्या साडेआठ कोटी रुपयांतून केवळ एकच सातारा वॉर्डातील रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे सातारावासीयांवर अन्याय होत असल्याचा प्रश्‍न नगरसेविका सायली जमादार यांनी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत केला होता. त्यावर जमादार यांच्या मागणीनुसार सातारा आणि देवळाईत रस्त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र 25 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश घोडेले यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत ही कामे करण्यात आले नसल्याचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्यावर अंदाजपत्रकाची माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारली असता आतापर्यंत साडेसतरा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. उर्वरित अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याचा खुलासा त्यांनी केला. 

कामाला सुरुवात करा : घोडेले 

नव्याने महानगरपालिकेत समावेश झालेले सातारा देवळाई हे दोन्ही वॉर्ड महत्त्वाचे आहे. येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील बैठकीत 25 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कामांना त्वरित प्रारंभ करा, वेळप्रसंगी कामांना कार्योत्तर मान्यता देऊ, असेही महापौर घोडेले यांनी सांगितले. तसेच सिडकोतील पाच कोटींच्या निधीसाठी पुन्हा पत्र सिडको प्रशासनाला पत्र पाठवा, असे आदेशही घोडेले यांनी दिले.  त्यावर दोन दिवसांत पूर्ण 25 कोटींचे अंदाजपत्रक तयार केले जाईल, असे अभियंता कोल्हे यांनी सांगितले.