Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कारखाली चिरडून तरुणाचा खून

औरंगाबाद : कारखाली चिरडून तरुणाचा खून

Published On: Mar 23 2018 8:42PM | Last Updated: Mar 23 2018 8:42PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

प्रेमप्रकरणातून कारचालक तरुणाने दुचाकीस्वार तरुणाचा भररस्त्यावर कारखाली चिरडून खून केला. कामगार चौक ते ठाकरेनगर रस्त्यावर एन-2 मैदानाजवळ दुपारी 4 वाजता ही थरारक घटना घडली. धक्‍कादायक बाब म्हणजे, त्याने कार वळवून आणत तब्बल चार वेळा जखमी तरुणाच्या अंगावर घातली. मदतीसाठी धावणार्‍या नागरिकांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यात काहींनी मदत करून जखमीला रस्त्याच्या बाजुला ओढल्यानंतर कारचालकाने भिंत आणि कारच्या मध्ये तरुणाला चिरडले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

संकेत संजय कुलकर्णी (19, मुळ रा. पाथरी, परभणी, ह. मु. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. यात त्याचे मित्र शुभम संजय डंख (18, रा. उस्मानपुरा) आणि विजय कडूबा वाघ (20, रा. जयभवानीनगर) हे दोघे जखमी झाले. या घटनेमुळे ठाकरेनगर भागात दहशत निर्माण झाली आहे. 

संकेत प्रल्हाद जायभाये (24, रा. गल्ली क्र. 11, जयभवानीनगर) असे कारचालक तरुणाचे नाव आहे. तो सीएसएमएस कॉलेजमध्ये फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेतो. त्याचे वडील सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून दुधाचा व्यवसाय करतात. त्याला मोठे भाऊ, बहीण असून दोघेही विवाहित आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी संकेत जायभायेच्या वडिलांना ताब्यात घेतले. 

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संकेत जायभाये आणि संकेत कुलकर्णी हे दोन वर्षांपूर्वी एन-3, सिडकोतील छत्रपती कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घ्यायचे. त्यांची दोघांची एकच मैत्रीण आहे. त्यामुळे त्यांच्यातही मैत्री निर्माण झाली. परंतु, तरुणीवरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. अधुन-मधून त्यांच्यात खटके उडायचे. दोन वर्षांपूर्वी उठालेली वादाची ठिणगी आतापर्यंतही कामय होती. दरम्यान, 23 मार्च रोजी संकेत जायभाये याने संकेत कुलकर्णीला भेटायला बोलावले. कुलकर्णी दुचाकीवर मित्रांना घेऊन एन-2 मैदानाच्या पाठीमागील गेटजवळ आला. तेथे संकेत जायभाये कार (क्र. एमएच 16, एजे 1585) घेऊन आला. त्याच्यासोबतही काही मित्र होते. मैदानाजवळच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पळापळ झाल्यावर संकेत कुलकर्णी याने मित्राला घेऊन दुचाकी ठाकरेनगरकडे नेली. त्याचवेळी संकेत जायभाये याने पाठीमागून कार सुसाट नेत दुचाकीला उडवले. कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या संकेत, शुभम आणि विजय यांना चिरडले. परंतु, संकेत कुलकर्णी कारखाली घसडला गेला. तर शुभम आणि विजय बाजूला पळाले. संकेत जायभाये एवढ्यावरच थांबला नाही. त्याने कार वळवून आणत पुन्हा संकेत कुलकर्णीच्या अंगावर घातली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, संकेत जायभाये याने तब्बल चार वेळा कार त्याच्या अंगावर घालून त्याला ठार मारले.

 

aurangabad, aurangabad news, murder, 19 year old boy,  ran over the car on injured boy 4 times