Tue, Apr 23, 2019 20:08होमपेज › Aurangabad › 20 वर्षांतील खरेदीचा हिशेब देण्याची कसरत सुरू

20 वर्षांतील खरेदीचा हिशेब देण्याची कसरत सुरू

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 1:11AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाच ते सात विभाग साहित्य खरेदी व्यवहारांचा हिशेब सादर न केल्यामुळे अडचणीत आले आहेत. सहसंचालक विभागाचे चौकशी पथक  येऊन गेल्यानंतर प्रशासनाने या विभागांना 24 तासांत हिशेब सादर करण्यास सांगितले. तथापि, ही प्रकरणे मागील 20 वर्षांतील असल्यामुळे जुनी बिले शोधताना या विभागांची दमछाक होत आहे. दरम्यान, या विभागप्रमुखांचा पदभार काढून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. 

केमिकल टेक्नॉलॉजी विभाग, प्राणिशास्त्र विभाग, जैव रसायनशास्त्र विभाग, भौतिकशास्त्र विभाग, वृत्तपत्रविद्या आदी विभागांचा आर्थिक व्यवहार संशयास्पद ठरला आहे. या विभागांनी मागील वीस वर्षांत अनेक साहित्य खरेदी केले. मात्र, त्यातील काही खरेदींचा हिशेब प्रशासनाला सादर केला नाही. सहसंचालक कार्यालयाच्या चौकशी पथकाने हिशेब सादर न केल्यास संबंधित विभागप्रमुख व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशी सूचना प्रशासनाला केली. त्यानंतर कुलसचिव कार्यालयाने तातडीने या विभागांना पत्र पाठवून राहिलेले हिशेब 24 तासांत लेखा विभागाकडे सादर करण्यास सांगितले. आमच्या कार्यकाळात खरेदी झाली नाही. त्यामुळे मागील बिले शोधणे आणि हिशेब सादर करणे कठीण असल्याचे काही विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी त्यांचे म्हणणे लेखी द्यावे, अशी भूमिका कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी घेतली आहे. त्यामुळे नाईलाज झाला असून जुनी बिले शोधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात येते.