होमपेज › Aurangabad › 'या' गावामध्ये एकही लग्‍न लावले जात नाही

'या' गावामध्ये एकही लग्‍न लावले जात नाही

Published On: Feb 22 2018 11:35AM | Last Updated: Feb 22 2018 12:29PMपाचोड : एजाज पठाण

शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यांचा ज्वर वाढत आहे. घरासमोर  आपल्याच गावात लग्‍न-सोहळे उरकण्याचाहट्ट धरणारे अनेकजण प्रत्येक गावागावांत पाहावयास मिळत असले तरी, विज्ञान युगात श्रद्धेपोटी चौंढाळा (ता.पैठण) गावामध्ये  गेल्या कित्येक पिढ्यांपासून एकही लग्‍न लावले जात नाही.

गावकरी गावाबाहेर लग्‍न विधीचा कार्यक्रम  टोपतात. या गावात लग्‍न न करणारे, दुमजली इमारती न बांधणारे आणि  पलंगाचा वापर न करणारेही आहेत. सर्वत्र लग्‍नसराईचा हंगाम सुरू आहे. काही ठिकाणी गावात पाणीटंचाई जाणवत  असल्याने शेतवस्त्यावर लग्‍नसोहळे उरकले जात आहेत. काही ठिकाणी शेतातही पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या भरवशावर गावातच विवाहसोहळे उरकले जात आहेत, परंतु या दोन्ही बाबींना छेद देऊन  पैठण तालुक्यातीत चौंढाळा गावाने आपले वेगळेपणाचे अस्तित्व सिद्ध केले आहे. चौंढाळा हे माहूरगडावरील रेणुकामतेचचे उपपीठ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.

या गावाच्या चौफेर पंधराशे ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावर मोठमोठ्या अफाट दगडी शिळा पसरलेल्या आहेत. या ठिकाणी रेणुकामातेचे हेमाडपंथी  मंदिर आहे. प्रांगणात 40 फूट उंचीच्या दीपमाळा आहेत. हे रेणुकादेवीचे  मंदिर ज्ञानेश्‍वर महाराजाच्या कालखंडातीलबांधलेले असून या गावात एकही दुमजली  इमारत अथवा पलंग  अस्तित्वात नाही.गावातील रेणुकामातेचे मंदिर एकमजली इमारतीऐवढे असल्याने या मंदिरापेक्षा आपल्या घराची उंची अथवा मजले अधिक असता कामा नये, अशी येथील ग्रामस्थांची भावना आहे. इतकेच नाही तर श्रद्धेपोटी  विज्ञान युगातही या गावामध्ये एकही लग्‍न लावले जात नाहीत. गावातील सर्व लग्‍न गावाबाहेर लावली जातात.  

रेणुकादेवी आमचे श्रद्धास्थान आहे. देवी अविवाहीत राहिल्याने आम्ही गावात कोणतेच लग्‍न लावत नाही. सर्व विवाहसोहळे गावाबाहेर करतो. तर देवीचे मंदिर एकमजली असल्याने  त्यापेक्षा आमचे घर उंच असू नये अशी आमची श्रद्धा असल्याने गावात  दुमजली घरे, इमारती नाहीत. ही श्रद्धा आम्ही कायम जपणार आहोत. -भाऊसाहेब पा. काळे