Wed, Mar 20, 2019 02:32होमपेज › Aurangabad › अशैक्षणिक कामाविरोधात शिक्षक संघाचा एल्गार

अशैक्षणिक कामाविरोधात शिक्षक संघाचा एल्गार

Published On: Jan 24 2018 6:38PM | Last Updated: Jan 24 2018 6:42PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता त्यांना फक्त शिकवूच द्या असे एकीकडे न्यायालय वारंवार सांगत असतानाच दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जात आहेत. याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने एल्गार पुकारला असून बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २६ जानेवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. याचे पदसिध्द सचिव त्या-त्या ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक असतात. मात्र त्यांनीच याकामी हात झटकल्याने या ग्रामसभांचे कार्यवृत्तांत लिहिण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे कि, हे काम शिक्षकांना लावणे योग्य नाही.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राज्य संपर्कप्रमुख मधुकरराव वालतुरे व राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवार २४ रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची भेट घेऊन ग्रामसभेचे कार्यवृत्तांत लिहिण्याच्या कामी कोणत्याच शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये, केल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा "कार्यवृत्तांत लिहिण्यास" पुर्णतः बहिष्कार राहील असे निवेदन सादर केले. अशाच आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनाही दिले आहे.

गावागावांमधील अंतर्गत वादाचे पडसाद ग्रामसभांमध्ये उमटत असतात. अनेक लाभांच्या योजनांचे लाभार्थीची निवड देखील यात करायची असते त्यामुळे विनाकारण वाद उद्भवतात. मुळात शिक्षकांना अशैक्षणिक कामांची सक्ती करणे योग्य नसताना शिक्षकांना विनाकारण अशी कामे करावी लागत आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकरराव वालतुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप ,कैलास गायकवाड, जालींदर चव्हाण, हारूण शेख, विष्णु बोरूडे, प्रवीण पांडे, संजय भडके, अशोक डोळस, किशोर पळसकर, योगेश खरात, खलील सय्यद आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.