Sun, May 26, 2019 09:37होमपेज › Aurangabad › सेक्स रॅकेटः सलूनचा एका दिवसाचा गल्ला दहा लाख रुपये!

सेक्स रॅकेटः सलूनचा एका दिवसाचा गल्ला दहा लाख रुपये!

Published On: Dec 09 2017 1:49AM | Last Updated: Dec 09 2017 1:44AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद पोलिसांनी गुरुवारी छापा मारून पर्दाफाश केलेल्या प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा व दी स्ट्रेस हब’ या दोन्ही स्पाचा एका दिवसांचा गल्ला सुमारे दहा लाखांच्यावर असल्याचे समोर आले आहे. दीडशे रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत कटिंग, मसाजचे दर असलेल्या या दोन्ही ‘स्पा’चा हा गल्ला देहविक्रीच्या ‘साईड बिझनेस’मुळेच वाढायचा, हे यावरून स्पष्ट झाले आहे. गुरुवारी पोलिसांनी या दोन्ही ‘स्पा’मधून सायंकाळीच साडेआठ लाख रुपये रोख रक्‍कम जप्त केली. त्यावरून ‘स्पा’च्या गल्ल्याचा अंदाज पोलिसांना आला. 

मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या आणि नामांकित या प्रोझोन मॉलमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेेल्या देहविक्री व्यापाराच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे व त्यांच्या विशेष पथकाने गुरुवारी पर्दाफाश केला होता. येथून पोलिसांनी थायलंड या देशाच्या नऊ वेश्यांसह एकूण 19 आरोपींना रंगेहाथ अटक केली. या कारवाईने एकच खळबळ उडालेली आहे. या दोन्ही ‘स्पा’मध्ये कटिंगचा दर दीडशे रुपये आणि मसाजचा दर अडीच हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेला होता. दिवसभरात दोन्ही ‘स्पा’मध्ये कटिंग आणि मसाज करण्यासाठी शंभर ग्राहक आले तरी अडीच हजार रुपये दराप्रमाणे जेमतेम अडीच लाख रुपये गल्ला होणे अपेक्षित आहे. मात्र, येथील दिवसाच्या गल्ल्याचे गणित येथे दररोज किती मोठ्या प्रमाणात देहविक्री व्यापार चालत होता, हे दर्शविणारेच आहे. येथे गुरुवारी पोलिसांना सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतच जमा झालेली तब्बल साडे आठ लाख रुपयांची रोख रक्‍कम गल्ल्यात आढळली. हा दिवसभराचा गल्ला असल्याची आरोपींनी कबुली दिली. त्यावरून कटिंग, मसाजच्या नावाखाली देहविक्रीसाठी येथे एका ग्राहकाकडून पाच ते पन्नास हजार रुपये फीस घेण्यात येत होती, हे तपासात समोर आले. याचा अर्थ दिवसभरात येथे अनेक व्हीआयपी ग्राहक मौजमजासाठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अनेक जण पोलिसांच्या रडारवर
या दोन्ही ‘स्पा’मध्ये येणारे अनेक वार्षिक मेंबर असलेले व्हीआयपी ग्राहकही आता पोलिसांच्या रडारवर आहेत. या शिवाय प्रोझोन मॉल व्यवस्थापकाच्या कार्यालयाला खेटूनच हे दोन्ही ‘स्पा’ होते. आपल्या बाजूलाच असा गोरखधंदा सुरू असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले कसे नाही, हेही एक कोडेच आहे. या ‘स्पा’च्या मालकांसह मॉल व्यवस्थापनाचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.