Mon, Aug 19, 2019 09:11होमपेज › Aurangabad › ‘फ्लिपकार्ट’वरून शस्त्रांची तस्करी

‘फ्लिपकार्ट’वरून शस्त्रांची तस्करी

Published On: May 29 2018 9:29AM | Last Updated: May 29 2018 9:40AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून खेळण्यांच्या नावाखाली चक्‍क शस्त्रास्त्रांची तस्करी होत असल्याचा धक्‍कादायक प्रकार औरंगाबाद पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईवरून उघडकीस आला. औरंगाबादेत अशा पद्धतीने मागविण्यात आलेला तलवार, गुप्‍ती, कुकरी अशा घातक शस्त्रांचा मोठा साठा गुन्हे शाखेने शहरातील इन्स्टाकार्ट कुरिअरच्या नागेश्‍वरवाडी आणि जयभवानीनगर येथील कार्यालयात रात्री छापे मारून जप्‍त केला. अशाच पद्धतीने केवळ औरंगाबादच नव्हे, तर देशभरात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची तस्करी झाल्याचे समोर येत आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी हा प्रकार मोठा धोकादायक आहे, हे विशेष. 

याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी आतापर्यंत स्वप्निल अशोकराव दहिवालकर (इन्स्टाकार्टचा हब मॅनेजर), विकास महादू दळवे (रा. नक्षत्रवाडी), जुबेर शाह दिलावर शाह (रा. वाळूज) यांना 4 जूनपर्यंत, तर नावीद खान उबेद खान (24, रा. उस्मानपुरा), चंदन आनंद लाखोलकर (22, रा. न्यू एसटी कॉलनी, मुकुंदवाडी), मुकेश भगवान पाचवणे (22, रा. लहुजीनगर, हर्सूल), सागर बन्सीलाल पाडसवान (21, रा. न्यू हनुमाननगर) यांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध शहरातील क्रांती चौक आणि मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. पानटपरी, शिक्षण आणि खासगी नोकरी करणारे आहेत.

‘फ्लिपकार्ट’ ही देशातील एक नामांकित ऑनलाईन शॉपिंग कंपनी आहे. या कंपनीमार्फत जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सर्व प्रकारचे सामान विकले जाते. हा सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतो. आपण ऑर्डर देताच कुरिअरद्वारे कंपनी आपण मागविलेली वस्तू पॅकिंग करून घरपोच पाठविते. या कंपनीमार्फत खेळण्यांच्या नावाखाली चक्‍क शस्त्रास्त्रे विक्री होत असल्याची माहिती माजी प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांना मिळाली होती. त्या माहितीची खातरजमा करण्याचे आदेश भारंबे यांनी गुन्हे शाखा पोलिसांना दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने शहरातील कोणत्या कुरिअरद्वारे या कंपनीचा माल वितरित होतो, याची माहिती काढली. तेव्हा ‘इन्स्टाकार्ट’ या कुरिअर कंपनीच्या औरंगाबादेतील नागेश्‍वरवाडी आणि जयभवानीनगर येथील कार्यालयात माल येत असल्याचे समजले. येथे खेळण्यांच्या नावाखाली शस्त्रे येत असल्याची खात्री पटताच सोमवारी रात्री गुन्हे शाखेने एकाच वेळी या कुरिअरच्या दोन्ही कार्यालयांवर छापे मारले, तेव्हा या धक्‍कादायक प्रकरणाचा उलगडा झाला.