Sun, Jan 19, 2020 16:06होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : नगरसेवकाच्या आरोपाने आयुक्‍त रागाने बाहेर पडले

औरंगाबाद : नगरसेवकाच्या आरोपाने आयुक्‍त रागाने बाहेर पडले

Published On: Jul 18 2019 3:49PM | Last Updated: Jul 18 2019 3:49PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

दूषित पाणी पुरवठ्यावरूनगु रुवारी काही नगरसेवकांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला. यावेळी एका सदस्याने आयुक्त गंभीर नसल्याचे विधान केले. त्यामुळे रागावलेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे तावातावाने सभागृहातून बाहेर पडले. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (गुरुवार) सकाळी सुरू झाली. सभेच्या सुरुवातीला मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. तसेच राजा ढाले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नगरसेविका मीना गायके यांनी दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याच वेळी अपक्ष नगरसेवक कैलास गायकवाड यांनी गायके यांना पाठिंबा देत महापालिका प्रशासनावर निशाणा साधला. प्रशासनावर टीका करताना गायकवाड यांनी महापालिका आयुक्त पाण्याच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचे विधान केले. त्यामुळे आयुक्तांचा पारा चढला. 

नगरसेवकांच्या या आरोपामुळे आयुक्त जागेवर ताडकन उठून उभे राहिले. त्यानंतरही गायकवाड यांचे बोलणे सुरूच होते. महापौरांनी गायकवाड यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु गायकवाड शांत झाले नाहीत. शेवटी महापालिका आयुक्त विनायक निपून हे डायसवरून उठून निघून गेले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र पुढच्या पाच मिनिटात आयुक्त निपुण पुन्हा डायसवर येऊन बसले. तोपर्यंत सभागृहनेता विकास जैन यांनी गायकवाड यांना शांत बसविले होते.