Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › भिकेचे डोहाळे, तरी मनपाची कोट्यवधींची उधळपट्टी सुरूच

भिकेचे डोहाळे, तरी मनपाची कोट्यवधींची उधळपट्टी सुरूच

Published On: May 09 2018 1:57AM | Last Updated: May 09 2018 1:52AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेने शहरात नवे पथदिवे बसवून त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे 114 कोटी रुपयांचे एका कंपनीला कंत्राट दिलेले आहे, परंतु हे काम सुरू होऊनदेखील पालिकेचे जुन्या ठेकेदारांवरील प्रेम कमी झालेले नाही. म्हणून मनपाने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्ती करणार्‍या जुन्या 22 कंत्राटदारांना पुन्हा एकदा 30 जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या ठेकेदारांवर पाच कोटी 45 लाख रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. मनपाच्या शनिवारच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मनपाने एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस या कंपनीला शहरातील पथदिव्यांचे कंत्राट दिलेले आहे. यामध्ये कंपनी शहरातील चाळीस हजार पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविणार आहे. तसेच दहा हजार नवीन विद्युत खांब लावणार आहे. या कंपनीने सहा महिन्यांपासून आपले काम सुरू केले आहे. तत्पूर्वी शहरात जुने 22 ठेकेदार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करत होते. या कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर या ठेकेदारांचे काम आपोआपच संपणार होते, परंतु तरीही मनपाने या ठेकेदारांवरील मर्जीखातर त्यांना दोन वेळा मुदतवाढ दिली. दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांत एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस या कंपनीने शहरात साडेचार हजार पथदिवे बसविले. या नव्या पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती कंत्राटदारच करणार आहे. असे असताना मनपाने आता पुन्हा एकदा जुन्या 22 ठेकेदारांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

प्रशासनाने शनिवारच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी हा प्रस्ताव ठेवला. त्यास सभेनेही मंजुरी दिली. त्यानुसार 30 जूनपर्यंत या ठेकेदारांकडून पाच कोटी 45 लाख रुपयांची कामे करून घेतली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्यासाठी मनपा प्रशासनाने आगामी काळातील सण-उत्सवांचे कारण दिले आहे. 

नगरसेवकांच्या अट्टहासापायी मनपाने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांसोबत काही नगरसेवकांची छुपी युती आहे. तर काही एजन्सी या नगरसेवकांच्या नातेवाइकांच्याच आहेत. त्यामुळे या ठेकेदारांची कामे सुरूच राहावीत, असा अनेक नगरसेवकांचा अट्टाहास असतो. त्यातूनच या ठेकेदारांना कारण नसताना पोसले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

हे आहेत ठेकेदार
स्टर्लिंग इलेक्ट्रिकल्स वर्क्स, न्यू एरा इलेक्ट्रिकल्स, श्री इलेक्ट्रिकल्स, आकाश इलेक्ट्रिकल्स, ईगल इलेक्ट्रिकल्स, तिरुपती इलेक्ट्रिकल्स, असंसो लाईटस्, साकळगावकर इलेक्ट्रिकल्स, बाणेश्‍वर इलेक्ट्रिकल्स, पूजा इलेक्ट्रिकल्स, मातोश्री इलेक्ट्रिकल्स.