Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Aurangabad › मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबाद महानगरपालिका बरखास्तीचा इशारा

मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबाद महानगरपालिका बरखास्तीचा इशारा

Published On: Jul 18 2018 5:09PM | Last Updated: Jul 18 2018 5:09PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शासनाने 91 कोटींचा निधी देऊनही महानगरपालिकेला कचराप्रश्‍न सोडविता आलेला नाही. पालिकेकडून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी थेट औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्याचा इशारा दिला. घनकचरा व्यवस्थापन आराखड्याची अमलबजावणी करण्यात कोणी अडथळा आणत असेल किंवा दबाव आणत असेल तर मला सांगा, असेही त्यांनी मनपा आयुक्‍तांना निक्षूण सांगितले. 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बुधवारी नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद शहरातील कचराप्रश्‍नावर विशेष बैठक घेतली. बैठकीला भाजपचे आमदार अतूल सावे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्‍त निपून विनायक यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील कचराप्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात मनपाला 91 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, चार महिने उलटूनही महानगरपालिकेने निविदा प्रक्रियाही पूर्ण केलेली नाही. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.