Tue, May 21, 2019 18:25होमपेज › Aurangabad › भाजप पदाधिकार्‍यांमध्येच जुंपली

भाजप पदाधिकार्‍यांमध्येच जुंपली

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:33AMऔरंगाबाद  ः प्रतिनिधी

कंत्राटी कामगार भरतीच्या मुद्यावरून मनपातील भाजप पदाधिकार्‍यांमध्येच जुंपली आहे. मनपातील अधिकार्‍यांनी खासगी एजन्सीच्या माध्यमातून मंजुरीपेक्षा अधिक कर्मचारी घेऊन मनपाचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी केला होता. तसेच या प्रकरणात मनपा आयुक्‍तांच्या चौकशीची मागणीदेखील त्यांनी केली होती. मात्र शनिवारी त्यांच्याच पक्षाचे असलेल्या स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी या भरतीचे समर्थन केले. शिवाय उपमहापौरांनी चुकीचे आरोप करू नयेत, त्यांनी माहिती तपासूनच बोलावे, असा सल्लाही बारवाल यांनी औताडे
यांना दिला.

महानगरपालिकेतील असंख्य पदे रिक्‍त आहेत, परंतु शासनाने मनपाला कायमस्वरूपी भरतीस मनाई केलेली आहे. त्यामुळे मनपाने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून दोन खासगी एजन्सींमार्फत कामगार घेतलेले आहेत. उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी याच विषयावर पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले. प्रशासनाने केवळ 97 कामगार घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी घेतली होती, परंतु प्रत्यक्षात 713 कामगारांना घेण्यात आले. त्यामुळे मनपावर आर्थिक भार वाढला आहे. खर्च बचतीसाठी आऊटसोर्सिंगचा पर्याय स्वीकारण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात खर्च वाढवून ठरवून हा घोटाळा केला. त्यामुळे या प्रकरणात मनपा आयुक्‍तांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी औताडे यांनी केली होती. त्यावर सभापती बारवाल यांनी शनिवारी औताडे यांचे आरोप चुकीचे असल्याचे नमूद केले. 

बारवाल म्हणाले, स्थायी समितीने जेवढे कामगार घेण्यास मंजुरी दिली होती, तेवढेच घेण्यात आले आहेत. काही ठिकाणी ऐनवेळी परिस्थिती निर्माण झाल्याने कामगार घेण्यात आले, परंतु त्यांची तातडीची गरज होती. प्रशासनाने ती गरज विचारात घेऊनच कामगार घेतले. या वाढीव कामगारांचा प्रस्ताव ठेवून त्यास कार्योत्तर मान्यता घ्यावी, अशी सूचना मी आयुक्‍तांना केली आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यावर त्यास कार्योत्तर मंजुरी दिली जाईल. यात काहीही चुकीचे नाही. उपमहापौरांनीही माहिती तपासूनच बोलावे, उगाच आयुक्‍तांवर चुकीचे आरोप करू नयेत, असेही बारवाल म्हणाले.