Wed, Feb 19, 2020 10:30होमपेज › Aurangabad › हत्तिणींची शनिवारी विशाखापट्टणमकडे रवानगी

हत्तिणींची शनिवारी विशाखापट्टणमकडे रवानगी

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 1:46AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील लक्ष्मी आणि सरस्वती या हत्तिणींना विशाखापट्टणमला पाठविण्यासाठी तारीख निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या शनिवारीच या हत्तिणींची विशाखापट्टणमकडे रवानगी करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र झू अ‍ॅथॉरिटीच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी प्राणिसंग्रहालयात येऊन पाहणी केली. महानगरपालिकेने प्राणिसंग्रहालय सुरू झाल्याच्या वेळी कर्नाटकमधून शंकर आणि सरस्वती ही हत्तींची जोडी आणली होती. या दोघांपासून सरस्वती या हत्तिणीचा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी शंकरचा मृत्यू झाला. तेव्हापासून सरस्वती आणि लक्ष्मी या दोघी माय-लेकीच प्राणिसंग्रहालयात होत्या. मध्यंतरी नॅशनल झू अ‍ॅथॉरिटीने हत्तींना मोकळ्या वातावरणात सोडण्याचा निर्णय घेतला होता. तरीही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे हे स्थलांतर लांबणीवर पडल होते. 

त्यातच हत्तींना साखळदंडात जखडून ठेवण्यात येत असल्याची न्यायालयाने स्वतःहोऊन दखल घेत या प्रकरणात शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या हत्तिणींना पाठविण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. आठवडाभरापूर्वीच विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्कच्या अधिकार्‍यांनी महानगरपालिकेला पत्र पाठवून हत्ती पाठविण्याचे नियोजन करण्याची सूचना केली होती. त्यानंतर मनपाने ट्रक भाड्याचा अंदाज घेऊन सुमारे एक लाखापेक्षा अधिक खर्च येईल, असे कळविले होते. मंगळवारी मनपाला इंदिरा गांधी पार्कच्या अधिकार्‍यांचे पत्र प्राप्त झाले. त्यांनी शनिवारी हत्तींना घेण्यासाठी येणार असल्याचे कळविले आहे.

प्राणिसंग्रहालयात हत्तींना साखळदंडात बांधून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र झू अ‍ॅथॉरिटीचे तांत्रिक अधिकारी डॉ. बाविस्कर आणि त्यांचे सहकारी सकाळी प्राणिसंग्रहालयात दाखल झाले. त्यांनी हत्तींची पाहणी केली, परंतु हत्ती विशाखापट्टणम येथे जाणार असल्याने त्यांनी याबाबत काहीही सूचना केल्या नाहीत. प्राणिसंग्रहालयातील इतर प्राण्यांच्या पिंजर्‍याची जागा वाढविण्यात यावी, संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात यावे, अशा सूचना या अधिकार्‍यांनी केल्या.