Mon, Aug 19, 2019 07:35होमपेज › Aurangabad › प्रक्रिया केंद्र बनले नवे नारेगाव

प्रक्रिया केंद्र बनले नवे नारेगाव

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेने प्रक्रिया केंद्रासाठी निवडलेल्या नवीन चार जागा आता ‘नारेगाव’ बनू लागल्या आहेत. या ठिकाणी रोज शेकडो टन कचरा टाकल्या जात आहे, मात्र नारेगाव प्रमाणेच त्यावर कोणतीच प्रक्रिया मनपाकडून होत नसल्याने या परिसराचेही आरोग्य धोक्यात आले आहे. आता त्यावर पावसाचे पाणी पडल्यामुळे हा कचरा जागेवरच सडत असून त्यातून संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे.

मनपाचा नारेगाव येथील जुना कचरा डेपो 16 फेब्रुवारीपासून बंद झाला. तेव्हापासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपाने कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव आणि कांचनवाडी अशा शहराच्या चार दिशांना चार जागा निश्‍चित केल्या. याशिवाय सेंट्रल नाका, रमानगर, शिवाजीनगर आदी ठिकाणीही कंपोस्टिंगसाठी जागा निवडल्या. शहरातील शेकडो टन कचरा रोज या जागांवर नेऊन टाकला जात आहे. त्यामुळे सध्या या जागांवर कचर्‍यांचे मोठमोठे डोंगर उभे राहिले आहेत. दुसरीकडे मनपाकडून कोणतीही प्रक्रिया होताना दिसत नाही. त्यामुळे प्रक्रिया केंद्राच्या नावाखाली नवे कचरा डेपोच मनपाने उभे केल्याचा आरोप होतो आहे. 
मनपाने हर्सूल येथे पाणीपुरवठा विहिरीला लागूनच कचरा टाकण्यासाठी जागा निवडलेली आहे. मात्र पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पावसानंतर कचर्‍यातील पाणी निचरून ते पाणीपुरवठ्याच्या विहिरीत गेल्याने या विहिरीतील पाणी दूषित झाले. त्यानंतर महापौरांनी तात्पुरत्या स्वरूपात येथे कचरा टाकणे बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या येथे नवीन कचरा टाकणे बंद आहे, परंतु आधीच्या कचर्‍याचे ढीग येथे कायम आहेत. त्याच पद्धतीने पडेगाव आणि चिकलठाणा येथेही कचर्‍याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. याशिवाय शहरातील सेंट्रल नाका येथेही शेकडो टन कचरा साठविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नागरिकांना येथून वावरणे कठीण झाले आहे.