Wed, May 22, 2019 17:15होमपेज › Aurangabad › ‘त्याच्या’साठी पतीला सोडले; पण त्यानेही झिडकारले

‘त्याच्या’साठी पतीला सोडले; पण त्यानेही झिडकारले

Published On: Mar 17 2018 10:52AM | Last Updated: Mar 17 2018 10:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘ती’ पुण्याची, ‘तो’ चाळीसगावचा. दोघांची भेट झाली अन् ते प्रेमात इतके अखंड बुडाले की ‘तिने’ त्याच्यासाठी चक्‍क पतीला फारकत दिली. त्याच्यासोबत पडेगाव भागात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये  राहिली. पण, त्याचे बेगडी प्रेम काही दिवसांत उघडे पडले. लग्‍नाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमवीराने तिला ‘हात’ दाखविला. यातच दोघांचे बिनसले आणि आता ‘तिने’ चक्‍क त्याच्याविरुद्ध बलात्कार  आणि फसवणुकीची फिर्याद दिली. 10 ते 19 फेब्रुवारीदरम्यान घडलेल्या या घटनेचा 15 मार्च रोजी छावणीत गुन्हा नोंद झाला. 

किरण रंगराव चव्हाण (35, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे गुन्हा नोंद झालेल्या प्रेमवीराचे नाव असून तो विवाहित आहे. तसेच तो तलाठी असल्याचे सांगितले जाते, परंतु अधिकृत माहिती मिळू  शकली नाही. आता पोलिस त्याच्या मागावर आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 26 वर्षीय पीडितेचे लग्‍न झालेले आहे, परंतु तिला अपत्यप्राप्ती झालेली नाही. दरम्यान,  तिची ओळख आरोपी किरण चव्हाण याच्यासोबत झाली. दीड वर्षापूर्वी झालेल्या त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले.

एकीकडे अपत्यप्राप्ती होत नसल्यामुळे ती नाराज होती. याच नाराजीचा फायदा घेत आरोपी किरण चव्हाण याने प्रेमाचे नाटक करून तिच्यासमोर लग्‍नाचा प्रस्ताव ठेवला. तिनेही लगेच संमती दर्शवून  पतीला फारकत दिली. त्यानंतर हे दोघे औरंगाबादेत पडेगाव भागात तारांगण सोसायटीमध्ये येऊन खोली किरायाने घेऊन राहिले. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहताना त्यांच्यात शारीरिक संबंध  प्रस्थापित झाले, परंतु प्रेमाचा हा अंकुर फुलण्याआधीच नष्ट झाला. आरोपी किरण चव्हाण विवाहित असल्याचे समजल्यावर त्यांचे बिनसले. दरम्यान, पीडिता बेपत्ता असल्याची तक्रार पुण्यात  नोंदविण्यात आली. पुढे या तक्रारीतच बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला, परंतु त्याचे घटनास्थळ पडेगाव असल्याने हा गुन्हा पुण्याहून छावणी ठाण्यात वर्ग झाला.  

सोसायटीतील नागरिकांनी केली होती तक्रार

पीडिता आणि आरोपी किरण चव्हाण हे 10 ते 19 फेब्रुवारीदरम्यान तारांगण सोसायटीत खोली करून राहिले. या दरम्यानच त्यांच्याविरुद्ध सोसायटीतील नागरिकांनी तक्रार केली होती. छावणी पोलिसांनी चौकशी केल्यावर पीडितेची आरोपीविरुद्ध तक्रार नसल्याचे समोर आल्यामुळे तेव्हा गुन्हा नोंद झाला नव्हता.

Tags : Aurangabad, Woman,Register,Case,Man, live in relationship,