Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Aurangabad › आधार लिंकिंगच्या सक्‍तीमुळे जनता त्रस्त

आधार लिंकिंगच्या सक्‍तीमुळे जनता त्रस्त

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 1:41AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

मोबाइल, बँक खाते, विमा पॉलिसी, पॅन कार्ड आदींशी आधार क्रमांक लिंक करण्याचे मेसेज सातत्याने येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आधार लिंक न केल्यास खरेच आपला मोबाइल अथवा बँक खाते बंद पडेल काय, या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे. सर्वसामान्यांशी निगडित असणार्‍या सहा सेवांशी आधार लिंक करण्याची मुदत जवळ येत असल्याने बँका, टपाल कार्यालयांत गर्दी वाढत आहे.

आधार क्रमांक इतर सेवांशी जोडण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. आधार क्रमांकावरून नागरिकांना सक्‍ती केली जाऊ शकत नाही, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी घेतली होती. मात्र दूरसंचार कंपन्या, बँकांकडून त्यासाठी आपल्या ग्राहकांना सातत्याने संदेश पाठविले जात आहेत. 

असा बसणार फटका

बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची मुदत येत्या 31 डिसेंबरपर्यंत आहे. आपल्या बँकेत जाऊन अथवा इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करून आधार क्रमांक खात्याशी संलग्न करता येऊ शकतो. आधार क्रमांक संलग्न न केल्यास बँक खाते गोठविले जाणार आहे. प्राप्तिकर खात्यात्या संकेतस्थळावर जाऊन आधार व पॅन कार्ड यांच्याबाबत विचारलेली माहिती भरल्यास पॅन कार्डशी आधार संलग्न होऊ शकेल. मुदतीनंतर प्राप्तिकराचे परतावे भरता येणार नाहीत.

विमा पॉलिसी व टपाल खाते

संबंधित विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून आधार लिंकिंग करता येऊ शकतो. त्यासाठी विमा पॉलिसी क्रमांक आणि जन्म तारीख द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जातो. भारतीय जीवन विमा निगमने ऑनलाइन लिंकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आधार लिंकिंग न करणार्‍यांच्या पॉलिसी 31 डिसेंबरनंतर रद्द होण्याची भीती आहे. म्युच्युअल फंड धारकांसाठीदेखील आधार सक्‍तीचे करण्यात आले आहे. टपाल खात्याच्या बचत प्रमाणपत्र व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारची जोडणी सक्‍तीची करण्यात आली आहे. टपाल खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन आधार लिंकेजचा अर्ज डाऊनलोड करून त्यातील माहिती भरावी. त्यानंतर हा अर्ज आपले खाते असणार्‍या टपाल कार्यालयात सादर करावा लागणार आहे. आधार संलग्न न करणार्‍यांचे टपाल खाते गोठविले जाणार आहे.

मोबाइलसाठी 6 फेब्रुवारीची मुदत

मोबाइल कंपनीच्या सेवा केंद्रात यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत आधार क्रमांक मोबाइलशी संलग्न न केल्यास आपला मोबाइल बंद होऊ शकतो.